सांगली : सांगलीत भाजपमध्ये भांडण नाही. महानगरपालिकेचे उमेदवार हे सर्व्हे, विनिंग मेरिट, तसेच नेत्यांशी चर्चा करून ठरवले जाणार आहेत. कोणाही नेते, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. आमदार सुधीर गाडगीळ हे नाराज नाहीत. जयश्री पाटील यांना 22 जागा देणार, असे मी कुठेही म्हटलेले नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप हा वेगाने वाढत आहे. पहिल्या क्रमांकावर भाजप आहे. पहिला व दुसरा क्रमांक यात मोठे अंतर आहे. भाजपचा विस्तार काही लोकांना बघवत नाही. पुण्यातही भाजपमध्ये खोडा घालण्याचा प्रकार सुरू आहे, तसे सांगलीसारख्या ठिकाणी आमच्यामध्ये बिब्बा घालण्याचा प्रयत्न झाला. आ. गाडगीळ यांच्याशी सकाळी चर्चा झाली आहे. त्यांना महापालिका निवडणुकीबाबत स्पष्टता दिली आहे. ‘भांडू नका’, अशा सूचना भाजप नेते, कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, अण्णासाहेब डांगे, वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र भाजपच्या मूळच्या जागांना हात लावला जाणार नाही.
महापालिकेचा पाच वर्षांचा कालावधी आणि तीन वर्षे प्रशासक, अशी आठ वर्षे झाली आहेत. या काळात अनेक नवे कार्यकर्तेही तयार झाले आहेत. भाजपच्या विद्यमान जागा कायम ठेवल्या जातील. नगरसेवकांना सरसकट उमेदवारी मिळणार नाही. सर्व्हे, विनिंग मेरिट आणि नेत्यांशी चर्चा करून उमेदवारी देण्यात येईल. महापालिकेत दोन अपक्षांसह भाजपच्या 43 जागा आहेत. जयश्री पाटील यांच्या 6 जागा आहेत. त्यामध्ये अॅडजेस्टमेंट नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाचेही नगरसेवक आहेत. त्यांच्याकडूनही नगरसेवकांची संख्या घेतली जाईल. याव्यतिरिक्त उरणार्या जागा आहेत, त्या कुणाला किती द्यायच्या, हे चर्चा करून ठरवू. जनसुराज्य शक्ती पक्षाचाही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात प्रभाव आहे. गडहिंग्लजपासून जतपर्यंत निवडणुकीवर प्रभाव टाकणारी ताकद आहे. त्यांचाही विचार होणार आहे. त्यांच्या जागा निश्चित होतील. आरक्षण सोडत व सर्व्हेनंतर नेत्यांची बैठक होईल, त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित होतील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, मी आमदार गाडगीळ यांच्याशी चर्चा केली आहे. जयश्री पाटील यांना 22 जागा देणार, असे मी कुठेही म्हटलेले नाही. त्याबाबत कोणतीही व्हिडीओ क्लिप काढून दाखवावी. काँग्रेसचे 22 नगरसेवक होते, त्यानुसार आम्हाला 22 जागा द्या, असे जयश्री पाटील यांनी म्हटले होते. त्यावर तुमच्यासोबत 6 नगरसेवक भाजपमध्ये आले आहेत. तुम्हाला 22 काय, 24 जागा देऊ, पण एक आरक्षण निश्चित होऊद्या, सर्वेक्षण होऊद्या, कोणाकडे स्ट्राँग उमेदवार आहेत, ते कळूद्या, कदाचित तुमचे 6 चे 4 उमेदवार करावे लागतील अन् 22 चे 24 ही करता येतील, असे मी जयश्री पाटील यांना सांगितले आहे. जागांबाबत त्यांची अपेक्षा असणार, त्यात चुकीचे काही नाही, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
महापालिका क्षेत्रात सहा नगरसेवकांनी प्रवेश केला असताना, 22 तिकिटे कुणाला देणार, असा सवाल करत आ. सुधीर गाडगीळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यावर शुक्रवारी सकाळी पालकमंत्री पाटील यांनी आ. गाडगीळ यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर आ. गाडगीळ हे पालकमंत्री पाटील यांच्यासोबत कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. आ. सुधीर गाडगीळ हे नाराज नाहीत. ते सदा प्रसन्न असतात. जर नाराज असतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गेल्यानंतर त्यांची नाराजी संपेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून काही मंडळी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. भाजपमध्ये भांडणे हाऊ देत, गट-तट पडू देत, मग आपले साधेल, अशी काही विरोधकांची इच्छा आहे. पण त्यांचा कोणताही हेतू साध्य होणार नाही, याची खात्री आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.