पलूस : वाझर येथील श्रमिक कष्टकर्यांचे आदर्श बळवंतराव शिरतोडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा यंदाचा 14 वा कॉम्रेड बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना, तर सातवा कॉम्रेड गीताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार भारतीय महिला फेडरेशनच्या ज्येष्ठ नेत्या, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पत्नी, कॉम्रेड उमा पानसरे यांना जाहीर झाला आहे. ही माहिती पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रा. डॉ. बाबुराव गुरव, मारुती शिरतोडे यांनी दिली.
गुरव म्हणाले, अखंड संशोधन आणि लेखनातून इतिहासाची नव्याने मांडणी करणारे सत्यशोधकी तत्त्वज्ञानाचे अधिष्ठाता डॉ. आ. ह. साळुंखे महाराष्ट्राचे खर्याअर्थाने भूषण आहेत. आतापर्यंत कामगार नेते तानाजी ठोंबरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोविंद पानसरे, क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर, डॉ. बाबुराव गुरव, किशोर ढमाले, नरसय्या आडम, संजय आवटे, नागराज मंजुळे, डॉ. भारत पाटणकर, संपतराव पवार, आमदार विनोद निकोले, धनाजी गुरव आणि डॉ. हमीद दाभोलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
गीताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार यापूर्वी महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्षा स्मिता पानसरे, प्रा. डॉ. गेल ऑम्वेट, उल्का महाजन, सुनीती सु. र., नजुबाई गावित, संध्या नरे-पवार आदींना प्रदान करण्यात आला आहे. यावर्षीचे दोन्ही पुरस्कार नोव्हेंबर महिन्यातील दुसर्या आठवड्यात प्रदान करण्यात येणार आहेत.