सांगली ः जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर झाली. त्यामध्ये आटपाडी, वाळवा आणि कडेगाव पंचायत समितीचे सभापती पद खुले झाले आहे, तर कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यांचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. तसेच पलूस व शिराळा पंचायत समित्यांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, खानापूर-विटा पंचायत समितीत नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), तर मिरज पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले.
सहा सभापतीपदे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे जिल्ह्यात चुरस पाहायला मिळणार आहे. सभापती पद खुले असलेल्या तालुक्यात इच्छुकांमध्ये उत्साह आहे. मात्र सोमवारी गट आणि गणांच्या आरक्षणानंतरच नेमके राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दि. 13 ऑक्टोबररोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, तहसीलदार लीना खरात यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आरक्षण सोडतीवेळी सुरुवातीला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यांची लोकसंख्या विचारात घेऊन, रोटेशननुसार टक्केवारीचा उतरता क्रम विचारात घेऊन आरक्षण काढण्यात आले. आरक्षण काढताना 1997 पासूनच्या आरक्षणाचा विचार करण्यात आला. त्यामुळे मिरज पंचायत समितीचे सभापती पद थेट अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले.1997 पासूनचे आरक्षण विचारात घेऊन शिराळा आणि पलूस पंचायत समितीचे सभापती पदही नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी थेट निश्चित करण्यात आले. त्यानंतर जत आणि खानापूर-विटा पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. ईश्वरी सुलाने या विद्यार्थिनीच्याहस्ते चिठ्ठी उचलण्यात आली. त्यामध्ये खानापूर-विटा पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) असे आरक्षित झाले.
आटपाडी, वाळवा, कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यांचे सभापती पद सर्वसाधारण म्हणून निश्चित झाले. त्यानंतर 1997 पासून पडलेले आरक्षण आणि रोटेशनचा विचार करून कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. त्यामुळे या तालुक्यात महिलांसाठी सभापती पदाची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे गावोगावी स्थानिक महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आटपाडी, वाळवा, कडेगाव तालुक्यांचे सभापती पद खुले झाल्याने या तालुक्यांत चुरस पाहायला मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या 61 गटांची आणि दहा पंचायत समित्यांच्या 122 गणांची आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात येणार आहे. त्यानंतरच खऱ्याअर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.