जत शहर : जत शहरात ठिकठिकाणी प्रचंड कचरा साचला होता. याबाबत दै. पुढारीने आवाज उठविल्यानंतर नगरपरिषदेला जाग आली. दिवाळीनंतर बंद असलेला कचरा उठाव गुरुवारी ‘पुढारी’च्या वृत्ताने युद्ध पातळीवर सुरु झाला. यामुळे जतकरांची कचर्याच्या दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.
जत नगरपरिषदेकडील कचरा गोळा करणार्या घंटागाड्या करार संपल्याने अचानक बंद झाल्या. यामुळे शहरातील कचरा उठाव बंद झाला होता. नेहमी शहरातील सर्वच प्रभागात ध्वनिक्षेपक लावून कचरा गोळा करत वातावरण निर्मिती कणार्या घंटागाड्या अचानक बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. नगरपरिषदेने कोणतीही पूर्वसूचना किंवा दवंडी न देताच शहरात घंटागाड्या बंद केल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचले होते. विशेष म्हणजे जत शहरातील मुख्य बाजारपेठेत तेली गल्लीकडे जाणारा कोपरा, सांगली अर्बन बँकेसमोर, सावंत गल्लीकडे जाणारा रस्ता, भाजी मंडई, ऐनापुरे मेडिकलसमोर पटाईत किराणा दुकान, याचबरोबर शहरातील सर्वच प्रभागात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचून दुर्गंधी सुटली होती. कचरा उठाव न केल्याने व्यापारी वर्गाबरोबरच जत शहरवासीय त्रस्त झाले होते.
दरम्यानच्या काळात प्रसार माध्यमातून शहरातील कचरा समस्येविषयी संतप्त पडसाद उमटू लागले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून जत शहरातील कचरा समस्येविषयी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना जाब विचारला. यावेळी राठोड यांनी कचरा उठाव करण्याचा करार संपल्याने व काही लोक कचरा उठावासाठी येणार्या कर्मचार्यांना धमकावत असल्यामुळे कचरा उचलण्यास कोणी तयार नाही. त्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. याबाबत प्रशासन योग्य तो तोडगा काढेल, असे आश्वासन दिले.