सांगली : महापालिकेकडील 10 शाखा अभियंते (स्थापत्य), तसेच विविध कार्यालयांतील 37 अधीक्षकांना कर्तव्यात कसूर करणे नडले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसात खुलासा मागवला आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास शिस्तभंगाची कारवाई होईल.
आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थापत्य विभागाकडील कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांना कामकाजातील त्रुटी, उणिवा, दिरंगाई दिसून आली होती. नेमून देण्यात आलेल्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कार्यारंभ देण्यात आलेल्या कामांची कोणतीही सविस्तर माहिती नसणे, विविध विकास कामांचे कार्यारंभ आदेश प्रलंबित ठेवणे, प्रलंबित प्रकरणांबाबत विचारणा केली असता कोणतेही स्पष्टीकरण न येणे आदी बाबी निदर्शनास आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत आयुक्त गांधी यांनी 10 शाखा अभियंते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विविध कार्यालयांमधील एकूण 37 अधीक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सर्वसाधारण पत्रव्यवहार, शासकीय पत्रव्यवहार, आपले सरकार पोर्टल, पी. जी. पोर्टल, मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडील प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे, लोकशाही दिन प्रकरणे, विधानसभा तारांकित/अतारांकित प्रश्न, प्रशासकीय अहवाल व लेखापरीक्षण अहवालाबाबत दि. 7 ऑक्टोबर, 2025 रोजी महापालिकेत सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रलंबित कामकाजाचा आढावा घेण्यात आला असता, कोणतीही माहिती नसणे, प्रलंबित प्रकरणांबाबत कोणतेही स्पष्टीकरण देता आले नाही. सोपवलेल्या पदाचे कामकाज, कार्य कर्तव्ये व जबाबदार्या यांची काहीच माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावरून 37 अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोन दिवसात खुलासा मागवला आहे.