ST Bus Truck Collision Mahad
महाड: महाड शहराच्या दस्तुरी नाका ते नातेखिंड या परिसरात मागील आठ दिवसांत एसटीचा दुसरा अपघात झाला. महाडकडून माणगावच्या दिशेने निघालेल्या एसटीने या मार्गावरील उभ्या असलेल्या ट्रक व दुचाकीस्वाराला धडक दिली. राजू मांडवकर (जि. रायगड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना आज (दि.४) सकाळी घडली.
यासंदर्भात महाड पोलीस ठाण्यातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड माणगाव कडे निघालेली एसटी बस (एमएच 14 बी टी 49 0 6) ही गाडी दस्तूरी नाका ते नातेखिंड मार्गावरील मटन शॉपच्या बाजूला रस्त्यावर उभे असलेल्या ट्रक व दुचाकीला (एम एच 06 डीजे 98 32) रस्ता सोडून जाऊन धडकली.
जखमी दुचाकीस्वाराला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. संबंधित एसटी बसचे टायर गोटा झाल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मागील महिन्याभरात महाड तालुक्यात एसटीच्या झालेल्या अपघातांची संख्या वाढत असून यासंदर्भात एसटी प्रशासनाने गंभीरपणे एसटीच्या गाड्या व चालकांना मार्गदर्शन करण्याबाबत विशेष कृती दल स्थापन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.