अलिबाग तालुक्यातील एका जेट्टीवर नुकतेच हजारो गॅलन डिझेल उतरविण्यात आले.  Stock photo
रायगड

Raigad News | डिझेल तस्करीची केंद्राकडून दखल, राज्याकडून मागितला अहवाल

गणेश सोनवणे

रायगड : अलिबाग तालुक्यातील एका जेट्टीवर नुकतेच हजारो गॅलन डिझेल उतरविण्यात आले. हे डिझेल उतरविताना तेथील स्थानिक मच्छीमारांनी पाहिले, परंतु करोडो रुपये खर्च होत असलेल्या सुरक्षा यंत्रणेला हा प्रकार का दिसला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकाराची तक्रार अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केंद्र शासनाकडे केल्यानंतर केंद्राने राज्यशासनाकडे अहवाल मागवला आहे.

मुंबई बंदरात येणार्‍या मोठमोठ्या जहाजांना भर समुद्रात थांबवून त्यातील डिझेल लुटले जाते.जहाजातून लुटून आणलेले डिझेल येथील स्थानिक मच्छीमार, ट्रकचालक यांना करोडो रुपयांना विकले जाते. यास स्थानिक यंत्रणांचेही यांचेही पाठबळ असल्याने डिझेल तस्करीचे प्रकार दिवसरात्र सुरु आहे. यातून सागरी सुरक्षेला धोका असल्याने अलिबाग येथील समाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केंद्र शासनास पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक बळीराम मोरे यांना पत्र पाठवून चौकशीची प्रक्रिया सुरु केली आहे.

डिझेल तस्करीमुळे मच्छीमारांच्या जाळी तुटणे, मच्छीमार बोटींना अडथळा आणणे, गोरगरीब मच्छीमारांना मारहाण करण्याची धमकी देणे असे प्रकार सर्रास होत असून या तस्करांविरूध्द अनेक प्रकारच्या कारवाया पोलिस तसेच तटरक्षक दलाने करूनही डिझेल तस्करांचे काळे धंदे बंद होत नसल्याने या प्रकरणी केंद्र सरकारने दखल घेवून मच्छीमारांना न्याय मिळवून द्यावा तसेच डिझेल तस्करी कायमची बंद होण्यासाठी सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सूपूर्द करावा, अशी मागणी संजय सावंत यांनी केंद्रीय गृहखात्याला पत्र पाठवून केली आहे. सावंत यांनी केंद्राला लिहीलेल्या पत्रामध्ये कोकण किनारपट्टीवरील सर्व बंदरांवर सीसीटीव्ही लावल्यास या डिझेल तस्करी करणार्‍या टोळ्या पकडल्या जातील, अशी आशा आहे. त्यामुळे केंद्राच्या किंवा राज्याच्या गृहखात्याने कोकण किनारपट्टीवरील सर्व बंदरांवर सीसीटीव्ही लावणे अपरिहार्य करणे आवश्यक आहे.

रायगड जिल्हयातील समुद्राला येवून मिळणार्‍या खाड्यामध्ये बेकायदेशीर चालत असलेल्या डिझेल तस्करांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी समाजाच्या वतीने विनंती सावंत यांनी केली आहे. बेकायदेशीर चालत असलेल्या डिझेल धंद्याची टोळी गुन्हेगारी स्वरूपाची असून या टोळीला स्थानिक सरकारी अधिकारी व राजकारणी मंडळी यांचा आश्रय असल्याने या टोळीने रायगडच्या किनारपट्टीवर करोडोंच्या डिझेल तस्करीचा उच्छाद मांडला आहे, असे सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे.

यापुर्वी तस्करांच्या या टोळीवर यलो गेट पोलिस ठाणे मुंबई, डिझेल तस्करी अंतर्गत मोक्का कायदयाव्दारे कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्हयात या टोळीतील लोक अटक होते. त्यानंतर मोका कोर्टाने त्याचा जामिन मंजुर केला होता. जामिनामध्ये त्यांना रायगड जिल्ह्यात जावू नये डिझेल तस्करी करू नये अशा अटी असल्याचे सावंत यांनी नमूद केले आहे. परंतु या अटी या टोळीने मानल्या नाहीत उलट त्यानंतर याच टोळीने पुन्हा रायगड जिल्ह्यातील खाडी लगत असणार्‍या किनार्‍यांवर तसेच समुद्रामध्ये डिझेल तस्करीचे बेकायदेशीर धंदा खुलेआम सुरु केला आहे.

मच्छिमारी सोसायट्यांचे नुकसान

डिझेल तस्कर समुद्रामध्ये व खाडीमध्ये मच्छिमार करणार्‍या मोठ्या बोटमालकांना कमी भावाने डिझेल देत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारी सोसायटीचे डिझेल कोणी घेत नसुन सोसायटी नुकसानात आहे व शासनाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. तरी या डिझेल तस्कराच्या टोळीवर आपल्या कार्यालयामार्फत त्यांचे जामीन रद्द व्हावे व यांच्यावर कठोरांत काठोर कार्यवाही व्हावी. हा बेकायदेशीर डिझेलचा काळा व्यापार बंद करण्यात यावा. तसेच या डिझेल तस्करांच्या टोळीचा तपास सीबीआयकडे दयावा अशी विनंती सावंत यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT