सुगरणीचे सुंदर खोपे झाडाला टांगू लागले ....! pudhari photo
रायगड

Raigad biodiversity : सुगरणीचे सुंदर खोपे झाडाला टांगू लागले ....!

शेतांच्या शिवारात दिसू लागली पक्ष्यांची घरटी,पक्षीप्रेमीआनंदले

पुढारी वृत्तसेवा

माणगांव : कमलाकर होवाळ

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !

संत बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या सुंदर काव्याची प्रचिती माणगाव परिसरातील शेतांच्याशिवारातून अनुभवास येऊ लागली आहे. पक्षी प्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरत आहे. जैवविविधतेने नटलेल्या रायगडमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वत्र विविध प्रकारच्या वनस्पती, गवत, फुलझाडे उगवली आहेत. शेतांमध्ये भात शेती बहरत आहे. ही भातशेती तयार होत असतानाच अनेक पक्षी शेतांच्या खाजनात माळरानांवर दिसून येत आहेत. यातच लक्ष वेधून घेणारा इवल्याशा आकाराचा असणारा सुगरण पक्षी घरटी बांधण्याच्या कामात व्यस्त झाला असून झाडांवर, फांद्यांमधून अनेक घरटी दिसू लागली आहेत.

सुगरणीचे हे घरटे पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार व पशू पक्षी निरीक्षक, अभ्यासक यांना खुणावत आहेत. रायगडमध्ये तयार झालेल्या भात शेतीच्या खाजणाजवळ सुगरण पक्ष्यांंनी आपल्या वसाहती उभारल्या असून एका एका झाडांवर पाच ते दहा घरटी टांगलेली दिसत आहेत. उत्तम कारागिरीचा नमुना म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुगरण पक्षाची घरटी भातशेती परिसरात मुबलक प्रमाणात दिसत आहेत. विशिष्ठ प्रकारचे गवत व भाताच्या पातीपासून तयार केलेली ही घरटी सुगरण नर पक्षाने बांधली आहेत. बाभळी व काटेरी झाडांवर ही घरटी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.

शेतीच्या प्रदेशात थव्याने हा पक्षी राहतो. भातपीक किटक व धान्य खातो. घरट्याला खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते. खालून निमुळते, लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार असते. सुगरण पक्षाच्या तीन जाती असून पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण व बाया सुगरण. भारत व शेजारील देशात हा पक्षी आढळतो.

पक्ष्याचा आकार चिमणी सारखा असून मातकट काळा रंग असतो. बया, विवर म्हणजेच सुगरण पक्षी ओळखले जातात. त्यांच्या विणकाम करून तयार केलेल्या घरट्यांमुळे, या पक्षांचा वीणीचा हंगाम मुख्यतः पावसाळी असतो. हे पक्षी थव्याने राहतात व नारळाच्या झाडांवर व इतर वृक्षांवरती संघटीत घरटी बांधतात. भारताचे पहिले पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलिम अली यांनी रायगड जिल्ह्यातील किहीम येथे सुगरण पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाबद्दल अभ्यास केला होता.

भातशेती बहरत आहे. काही पक्षांचा विणीचा हंगाम याच काळात सुरु होतो. विणीच्या हंगामा करिता सुगरण पक्षी घरटी बांधतात. हा पक्षी थव्याने राहतो. सुयोग्य व अनुकूल परिसर असल्याने मोठया प्रमाणात सुगरण पक्षाची घरटी दिसत आहेत. जैव विविधता व वन्य पक्षांसाठी व अभ्यासकांसाठी ही चांगली बाब आहे. यामुळे ही घरटी पाहण्यासाठी पक्षीप्रेमी येतील,असे बोलले जाते.

सुंदर वीणकामाचा नमुना

विशिष्ट प्रकारचा घरट्याचा आकार, त्याची रचना व कौशल्य पूर्ण केलेले विणकाम यामुळे सुगरणीचे घरटे अतिशय सुंदर दिसते. मे ते सप्टेंबर हा सुगरण पक्षांचा विणीचा हंगाम असतो. नराने बांधलेल्या घरट्यात मादी आपली अंडी उबवून प्रजननाचे काम पूर्ण करते. एका वेळेस एक नर कमीत कमी चार ते दहा घरटी तयार करतो. अर्धवट बांधलेल्या घरट्यात मादी यावी म्हणून सुरेल आवाज काढून मादीला आकर्षित करतो. मादी सुगरण घरट्यात येऊन निरीक्षण करते. त्या घरट्यातील एखादे घरटे आवडले तरच ती नराला दादला म्हणून निवडते. एक वेळी मादी सुगरण दोन ते चार अंडी घालते. नराने अर्धवट बांधलेले घरटे ती स्वतः व नर पूर्ण करून पिलांना त्या घरट्यात ती वाढविते. घरटी भात खाजणात, दिसून येत आहेत. मुबलक खाद्य व अनुकूल परिस्थिती असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सुगरण पक्षांची घरटी दिसत असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.

सुगरण पक्षाचा मे ते सप्टेंबर विणीचा हंगाम असतो,विणीच्या हंगामात नराचा रंग पिवळा होतो, एरव्ही नर व मादी दिसायला सारखी असतात, विणीच्या हंगामात नर तीन चार खोपे विणतो. त्या सर्व खोप्या मधील एक खोपा मादी पसंद करते व नंतर दोघे मिळून खोपा पूर्ण करतात, मादी दोन ते चार अंडी देते. अंडी उबवण्यापासून ते पिल्ले मोठे होण्या पर्यंत सर्व देखभाल मादी करते.
राम मुंढे, पशू पक्षी निरीक्षक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT