धनराज गोपाळ
पोलादपूर : तालुक्यातील दुर्गम भागातील तब्बल ४४ गावांचा आरोग्य डोलारा सांभाळणाऱ्या पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना केवळ एकाच डॉक्टरच्या खांद्यावर संपूर्ण भार आहे. त्यातच जीर्ण झालेली इमारत आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे येथील आरोग्यसेवा अक्षरशः कोलमडली असून, रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
पितळवाडी आरोग्य केंद्रात दररोज ५० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. पोलादपूर तालुक्यातील ही सर्वाधिक ओपीडी असणाऱ्या केंद्रांपैकी एक आहे. मात्र, येथे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. डॉ. सोपान वागतकर हे एकटेच वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दुसरे डॉक्टर विभूते हे अनेक दिवसांपासून गैरहजर आहेत, तर तिसरे पद रिक्तच आहे. यामुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांची मोठी हेळसांड होते.
वैद्यकीय अधिकारी : ३ पैकी २ पदे रिक्त
आरोग्य सेवक : ५ पैकी २ पदे रिक्त
नर्स (परिचारिका) : ५ पैकी १ पद रिक्त
आरोग्य सहाय्यक : २ पैकी १ पद रिक्त
आरोग्य सहायिका : १ पद रिक्त
सध्या वापरात असलेली आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून, तात्पुरती डागडुजी करून तिचा वापर सुरू आहे. इमारतीची पाण्याची टाकी आणि शौचालयाची टाकी नादुरुस्त झाल्याने पाणी आणि स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या केंद्रासाठी शासनाचा निधी मंजूर होऊनही जागेच्या वादामुळे तो परत गेल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी दिली. जागेचा प्रश्न न सुटल्याने सुविधा देता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
एकीकडे शासनाकडून आरोग्य सुविधांवर भर दिला जात असताना, दुसरीकडे पितळवाडीसारख्या दुर्गम भागातील लोकांच्या नशिबी मात्र हेळसांड आली आहे. त्यामुळे प्रशासनाने जागेचा वाद तातडीने मिटवून, रिक्त पदे त्वरित भरावीत आणि येथील आरोग्यसेवा सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुका आणि जिल्हा आरोग्य अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन जनतेला दिलासा देणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.