पेण तालुक्यातील खारेपाट भागातील कणे - कोप्रोली ही खारबंदिस्ती ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहून जाण्याची भीती वाढली आहे. pudhari photo
रायगड

Farmland flood threat Raigad : कणे - कोप्रोली खारबंदिस्ती वाहून जाणार ?

निकृष्ट बांधकामामुळे नऊशे एकर शेती पाण्याखाली ; शेतकर्‍यांनी धरले अधिकार्‍यांना जबाबदार

पुढारी वृत्तसेवा
पेण ः स्वप्नील पाटील

पेण तालुक्यातील खारेपाट भागातील कणे - कोप्रोली ही खारबंदिस्ती ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहून जाण्याची भीती वाढली आहे. ही बंदिस्ती वाहून गेली तर परिसरातील जवळपास नऊशे एकर जमीन पाण्याखाली जाऊन शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठेकेदाराने हे काम जरी निकृष्ट दर्जाचे केले असले तरी त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या अधिकार्‍यांची देखील तेवढीच जबाबदारी होती, त्यामुळे हा जो धोका निर्माण झाला आहे त्याला अधिकारी देखील जबाबदार असल्याचे येथील शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकर्‍यांची भातशेतीचे पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी अगदी पूर्वीपासून खारबंदिस्ती ही संकल्पना राबवली जात आहे. पूर्वी स्थानिक ग्रामस्थ स्वतःच्या अंगमेहनतीने जी खारबंदिस्ती उभारायचे ती अतिशय भक्कम असायची मात्र आता अत्याधुनिक यंत्रांच्या द्वारे विविध प्रकारची मशीनरी वापरून देखील ही बंदिस्ती निकृष्ट दर्जाची होऊन ती वाहून जात असल्याने यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होत असेल हे स्पष्ट होत आहे.

तालुक्यातील कणे - कोप्रोली ही जवळपास नऊ ते दहा कोटी खर्च करून तयार होत असलेल्या बंदिस्तीच्या कामाचे शुभारंभ 26 जानेवारी रोजी करण्यात आला. मात्र नियमानुसार ज्या पद्धतीचे काम सुरुवातीला करायला हवे होते त्याप्रमाणे कामाची सुरुवात न झाल्याने ही बंदिस्ती आता हळूहळू पावसाच्या तसेच उधाणाच्या पाण्याने फुटत चालली आहे. मात्र ठेकेदाराने जावई शोध लावत हे पाणी थांबविण्यासाठी बांबू उभे केले आहेत.

जवळपास 32 वर्षानंतर ही बंदिस्ती होत असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करत कामासाठी आपल्या शेतामधून ठेकेदाराच्या मशिनरी आणि मालाच्या गाड्या जाण्यासाठी रस्ता दिला. त्याबदल्यात शेतकर्‍यांना शेतीची होणारी नुकसानभरपाई आणि कडक झालेली शेती नांगरून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकर्‍यांची नुकसान भरपाई तर नाहीच पण ही खारबंदिस्ती सुद्धा निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप गाव समिती अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे आणि ग्रामस्थ श्रीकांत पाटील यांनी केला आहे.

एकंदरीतच पेण खारेपाट भागातील जनतेला फक्त पिण्याच्या पाण्यापासूनच नाही तर आपली शेती वाचविण्यासाठी आणि गावात येणार्‍या पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी देखील समस्येला तोंड द्यावे लागत आहे याशिवाय मोठे संकट काय असू शकते.

ठेकेदारच बेपत्ता

सदर कामाचा मुख्य ठेकेदार हा काम सुरू झाल्यापासून इकडे फिरकलाच नसून दुसर्‍या व्यक्तीवर काम सोपवून हात वर केलेले आहेत, तर अधिकारी वर्गाकडून देखील सदर ठेकेदाराचे कशाप्रकारे काम चालू आहे याचा पाठपुरावा घेतला जात नाही शिवाय आम्ही या कामाबाबत शासकीय कार्यालयात आंदोलने केली, पत्रव्यवहार केले तरी देखील या ठेकेदाराबाबत तशा प्रकारचा पत्रव्यवहार संबंधित अधिकारी वरिष्ठ स्तरावर करत नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान सदर प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनी खरभूमी विकास अधिकार्‍यांशी फोनवरून संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

32 वर्षानंतर हे काम होत आहे हे ऐकून समाधान वाटत होते. मात्र हे अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम होईल असे वाटले नव्हते. प्रशासनाला या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत पत्रव्यवहार केला, आंदोलने केली तरी देखील या ठेकेदारावर कारवाई झाली नाही.त्यामुळे या सर्व प्रकाराला ठेकेदारासह अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत.
राजेंद्र म्हात्रे, गाव समिती अध्यक्ष कणे
सदर खारबंदिस्तीचा शेतकर्‍यांच्या शेतीचे बचाव होण्यासाठी काहीही उपयोग नाही. ठेकेदाराने आम्हाला आमच्या शेतातील नुकसानीचे भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते त्यातही आमची दिशाभूल केली आहे. या निकृष्ट दर्जाचे कामामुळे आमची नऊशे एकर जमीन पाण्याखाली जाऊन नुकसान होणार आहे जबाबदार आहेत.
श्रीकांत पाटील, ग्रामस्थ - कणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT