म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील गावांमध्ये प्राचीन व पुरातन इतिहास व ऐतिहासिक महत्व असलेली अनेक मंदिरे आहेत. काही मंदिरे नदीच्या काठावर आहेत तर काही मंदिरे डोंगर कपारीत वसलेली आहेत. म्हसळा तालुक्यात प्राचीन आणि पुरातन मंदिरांचे जतन होणे आवश्यक आहे. यातून हा मौल्यवान प्राचिन ठेवा जतन होईल, शिवाय पर्यटनदृष्ट्या विकास होण्यास मदत होणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यापासून सुमारे 27 किमी अंतरावर आणि लोणेरे फाट्यापासून सुमारे 34 किमी अंतरावर दक्षिणेकडे माणगाव-श्रीवर्धन रस्त्यावर असलेला, भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही कालावधीनंतर स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झालेला, मुंबई जवळचे तिसरे विकसित होऊ शकणारे उपनगर म्हणून चर्चेत असणारा, दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचा तालुका, माणगाव, महाड, श्रीवर्धन, तळा, रोहा या तालुक्यांना राज्य मार्गाने जोडणारा आणि अलिकडील काळात नव्याने विकसित होणारे दिघी बंदर आणि रोहीणी बंदरांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा, दिवेआगर, वेळास, आदगाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर या पर्यटनच्या नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या पर्यटन ठिकाणी जाण्याचा राजमार्ग ज्या तालुक्यातून जातो असा नैसर्गिक दृष्टीने अतिशय समृद्ध परंतु विकासाच्या काही अंगाने वंचित असल्यामुळे आर्थिक दृष्टीने मागासलेला परंतु आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी अनेक संधीनी ुक्त असलेला तालुका म्हणजे म्हसळा तालुका होय.
आजमितीस म्हसळा नगरपंचायत शहराचे अणि 39 ग्रामपंचायतीच्या तालुक्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जात आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुमारे पाच हजार पर्यटक आणि चारपाच दिवस जोडून सुट्ट्या आल्या तर सरासरी दिवसाला दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक म्हसळ्यातील मुख्य रस्त्यावरूनच सुप्रसिद्ध सुवर्ण गणेश दिवेआगर, दक्षिण काशी हरीहरेश्वर, श्रीवर्धन बीच, वेळास बीच, आदगाव, मुरुड बीच, जंजिरा किल्ला याठिकाणी ये - जा करीत असतात.
त्याचप्रमाणे दिघी बंदरात आयात होणारी कच्चा लोहपोलादाची आयात आणि रोहीणी येथील ‘दास कंपनी’मध्ये तयार होणारा कच्चा व पक्का माल याची वाहतूक देखील याच म्हसळा तालुक्यातून होते. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी अधिकाधिक व्यापक दृष्टिकोन असणे ही काळाची गरज असणार आहे आणि त्यादृष्टीने निसर्गाची हानी होऊ न देता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून म्हसळा तालुक्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
म्हसळा तालुक्यातील गावांमध्ये प्राचीन व पुरातन इतिहास व ऐतिहासिक महत्व असलेली अनेक मंदिरे आहेत. काही मंदिरे नदीच्या काठावर आहेत तर काही मंदिरे डोंगर कपरीत वसलेले आहेत. म्हसळा तालुक्यापासून 9 किमी अंतरावर वसलेले घुमेश्वर (घुम) गाव येथे प्राचीन काळापासून स्वयंभू शंकराची पिंडी असलेले स्वयंभू श्री घुमेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठया उत्साही व भक्तिमय वातावरणात साजरे केले जाते. या सर्व ठिकाणांचा विकास होणे महत्वाचे आहे.
निसर्गरम्य परिसरामुळे अनेक संधी
देवघर कोंड याठिकाणचे दत्तमंदिर आणि अमृतेश्वर मंदिर परिसर विकसित करून त्याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे आहेत. वारळ गावचे स्वयंभू श्री दत्त गुरूंचे मंदिर, म्हसळा-धनगर मलई रस्त्यावर असलेले वाघेश्वरी देवस्थानचा परिसर विकसित करून पर्यटकांना जंगल सफारीची सोय उपलब्ध करून, गोरेगाव-म्हसळा रस्त्यावरील देहन नर्सरी परिसर आणि चिरगाव गिधाड संवर्धन प्रकल्प विकसित करणे तसेच खामगाव जवळ असणारे भीमाशक्ती पीठ हा निसर्गरम्य परिसर भाविक व पर्यटकांसाठी विकसित करणे गरजेचे आहे.