कोप्रोली (उरण) ः नवघर खोपटे या मार्गावरील फूटपाथ गिळंकृत केले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे . तसेच या मार्गावर अनेक जड अवजड वाहने वाहतूक करत असल्यामुळे येथे रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने येथील स्थानिक जनता नेहमीच त्रासलेली असते यावर योग्य तो उपाय करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासनाचे या गंभीर असलेल्या प्रशाकडे लक्ष आहे की डोळेझाक होत आहे असा प्रश्न येथील जनता करत आहे. तालुक्यात ज्याप्रमाणे अनेक गोडाऊन आहेत मोठ्या प्रमाणात येथे वाहतूक चालू असते त्याच प्रमाणे येथे संपूर्ण उरण तालुका भर भंगार वाल्यांनी रस्ते किंवा भेटेल त्या ठिकाणी आपले बस्तान मांडले असून त्याचा नाहक त्रास येथील सामान्य जनतेला भोगावा लागत आहे.त्यामुळे अशा अनधिकृत भंगार वाल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी ओरड होत आहे.
दाखवण्यासाठी रस्त्याच्या कडेला भंगार असतो परंतु काही दिवसांत तेच भंगार कधी फूटपाथ गिळंकृत करते हेच समजत नाही. जेव्हा वाहतूक कोंडी होते तेव्हा चालणार्यांनी चालावे कुठून असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. तसेच दिशादर्शक फलकही भंगारच्या अतिक्रमणात गडप झाल्याचे दिसून येत आहे. नो पार्कींग बोर्ड तर भंगारच्या आत उभा आहे की काय हेच समजत नाही. तेव्हा अशा उरण मधील सर्व अनधिकृत आणि अधिकृत असलेल्या नियम मोडणा़र्या सर्व भंगार वाल्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजेत अन्यथा गुन्हेगारी विश्वातील अनेकजण याचा आसरा का घेणार नाहीत अशी भीती वजा शंका येथे उपस्थित करण्यात येत आहे .
याविषयी तेथील कामगारांना विचारले असता समजले की मालक हजर नव्हते आणि भंगारा चे विचारले तेव्हा समजले की रस्त्यावर आलेले भंगार उचलणार आहोत, तसेच सिडको अतिक्रमण अधिकारी भरत ठाकूर यांना फोन द्वारे संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.