नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भाताण बोगद्यात आज सकाळी मोठा अपघात झाला. या विचित्र अपघातात तब्बल सात ते आठ वाहने एकावर एक आदळली. या वाहनांमध्ये पाच ते सहा पोलिसांच्या पिंजरा गाड्या, एक एसटी महामंडळाची बस, एक टेम्पो, एक पोलिसांची स्कॉर्पिओ आणि एक जीप यांचा समावेश आहे.
हा अपघात पुणे लेनवर घडला असून, या सर्व गाड्या मुंबईहून पुण्याकडे जात होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा ताफा बांगलादेशी कैद्यांना घेऊन निघाला होता.
अपघात इतका भीषण होता की अनेक वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही कैद्याला दुखापत झाली नाही. मात्र, या वाहनांचे चालक असलेले सुमारे १० ते १२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलिस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
ठाण्यातून पुण्याकडे जाताना आज सकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान भातण बोगद्यात पोलिसांच्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. अचानक ब्रेक मारल्याने मागची गाडी पुढच्या गाडीला धडकली. ठाण्याहून 160 बांगलादेशी घुसखोरांना घेऊन या गाड्या पुण्याकडे निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. 10 ते 12 जण किरकोळ स्वरुपात जखमी झाले.
160 बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केल्यानंतर त्यांना बांगलादेशात पाठविण्यासाठी आज ठाणे पोलीसांचा ताफा पुणे विमानतळाकडे जात असताना अपघात झाल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलीसांचा स्पेशल ताफा या बांगलादेश घुसखोरांना सोडण्यासाठी जात होता.
कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांनी नेण्यात येत होते. या अपघातात पोलीस वाहनांचे नुकसान झाले असून कुणी ही गंभीर जखमी नाही. रसायनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत या मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. नुकतीच वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे. महामार्ग पोलीस निरीक्षक आणि त्याचे कर्मचारी वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न सकाळपासून करत होते.