रायगडच्या किनाऱ्यावर मच्छीची आवक वाढली Pudhari Photo
रायगड

Raigad | रायगडच्या किनाऱ्यावर मच्छीची आवक वाढली

पुढारी वृत्तसेवा
मुरूड शहर : प्रकाश सद्रे

ये दादा आवार ये, कवरा वाटा लावला मोटा... अशा प्रकारे मच्छीविक्रेत्या महिला ग्राहकदादाला विनवणी करातनाचे चित्र जिल्ह्यातील विविध मच्छी मार्केमधून दिसून येत आहे. गेली काही महिन्यांपासून मच्छीमार्केटमधील मच्छीचा दुष्काळ दूर झाला आहे. समुद्रातील ताजी मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहे. त्यामुळे मच्छीचे दर कमी झाले आहेत. पन्नास रुपयांपासून मच्छीचा वाटा मिळू लागल्याने खवय्यांचा चांगलीच चंगळ झाली आहे. सध्या मुरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळंबी सापडून येत आहे.

मच्छीमारीचा नवा हंगाम सुरु झाला आहे. सुरुवातीला वादळी वार्‍याने मच्छीमारी होऊ शकली नसली तरी आता अनुकूल वातावरण असल्याने मच्छीमारी पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. सध्या जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पापलेट, सुरमई, कोळंबी, बोेंबील या प्रमुख मच्छीसह विविध प्रकारची मोच्छी मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे खवय्यांची चांगलीच चंगळ झाली आहे.

दोन - तीन दिवसांपासून मुरूड जवळील पदमजलदुर्ग समुद्र किनारपट्टीत कोलंबी मोठ्या प्रमाणावर मिळत असून एकदरा, मुरूड आणि राजपुरी येथील सुमारे 50 नौका एकाच वेळी कोलंबी मासेमारी मोहिमेवर आरूढ झालेल्या रविवारी (22 सप्टेंबर) दिसून आल्या. त्यामुळे मुरूड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळंबीची आवक झाल्याचे दिसून आले. कोळंबी आवक वाढती असल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ झाल्याचे दिसून येत आहे. मुरुडच्या बंदर मार्गावरून जाताना या नौकांची समुद्रातील साखळी लक्ष वेधून घेत आहे.

गणेशोत्सवात मासळीची कमतरता मोठया प्रमाणात जाणवली होती. अजूनही फारसे पर्यटक नसल्याने स्वस्त कोलंबी मासळीचा लाभ घेत मुरुडकर कोळंबी खरेदी करून फ्रीज मध्ये स्टॉक करण्यासाठी सरसावल्याचे दिसून आले. कोलंबी वाटा 50 रुपयांवर आल्याने अनेकांची चंगळ उडाली. कोळंबी मोठया प्रमाणात येत असल्याने कोळी महिला भगिनी गावोगावी विक्रीसाठी दारावर जाताना दिसून आल्या. हवामानात अचानक बदल होत असल्याने येथील नौका खूप खोलवर मासेमारीस जात नाहीत. सुदैवाने याच वेळी पदमजलदुर्गच्या उथळ समुद्रपरिसरात कोलंबी मोठ्या प्रमाणात येत असल्याने एकदरा, राजपुरी च्या नौका मोहिमेवर दिवसातून दोन वेळा जाताना दिसून येत आहेत. टायनी, चैती, सोलट अशा प्रकारातील कोलंबी कमी अधिक प्रमाणात जाळ्यात मिळत असल्याचे राजपुरी येथील मच्चीमार धनंजय गिदी यांनी सांगितले. बोंबील फारसे मिळत नाही असे दिसून आले. शेलबेल, मिक्स निवड देखील भरपूर मिळाल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

मच्छीचे दर सर्वसामान्यांच्या आटोक्यात

जिल्ह्यात विविध ठिकाणच्या मच्छीमार्केटमध्ये पापलेट, सुरमई, बगे, बोंबील, कोळंबी, हालवे या प्रमुख मच्छीची मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कधी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असलेल्या मच्छीचे दर आता आटोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे.

मच्छीमारांना दिलासा

संकष्टीनंतर येथे समुद्रात भांग लागत असल्याने बोंबील मच्छीचे प्रमाण कमी होते. समुद्राला उधाण आल्यानंतर बोंबील जाळयात मिळतात अशी माहिती धनंजय गिदी यांनी दिली. लाल रंगाच्या टायनी कोलंबिला मार्केटमध्ये फारसा भाव मिळत नाही. नौकांचे डिझेलचा खर्च जेमतेम सुटत असतो अशी माहिती एकदरा येथील रोहन निशानदार यांनी दिली. सोलट कोलंबी मिळाली तर अधिक फायदा होत असतो; मात्र मिळेलच याची खात्री नसते असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT