उरण ः जासईत 15 जून रोजी काही परप्रांतियांनी माझ्यावर तलवार, लाठ्या काठ्यांनी हल्ला करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा मोठा कांगावा करून या बाबत प्रेमसिंग यादव यांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गोवंश हत्येेवरून परप्रांतियांनी हा हल्ला केला असल्याचे भासवून उरण तालुक्यातील धार्मिक वातावरण तप्त केले होते. मात्र उरण पोलिसांनी याचा गंभिरपणे तपास करून प्रेमसिंग यादव याचा बनाव उघड केला आहे.
प्रेमसिंग यादव हा दारू पिऊन एका ट्रेलर चालकाला मारताना जखमी झाला होता. त्यानंतर त्याने जासई येथे जाऊन आपल्यावर हल्ला झाल्याचा व्हिडीओ बनवून समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. पोलिस सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार प्रेमसिंग यादव याच्या मित्राचे द्रोणागिरी नोडमध्ये एका ट्रेलर चालकाशी भांडण झाले होते.
प्रेमसिंग यादव याने ट्रेलरच्या समोरील काचेवर डाव्या हाताने फाईट मारून फोडली त्यामध्ये प्रेमसिंग यादव याच्या हाताला काच लागून जखमी झाला होता. त्यानंतर त्याने जासई येथिल धाब्यावरच्या गोवंश हत्तेचा आरोप करणार्या धाबेवाल्याला पोलिसांच्या कचाट्यात अडकविण्यासाठी हल्ला झाल्याचा बनाव रचला होता. मित्रांची चौकशी केल्यानंतर हे सत्य समोर आले. त्यानंतर प्रेमसिंग यादव याने देखिल पोलिसांना हा बनाव असल्याचा जबाब दिला आहे.
प्रेमसिंग यादव याच्या या बनावामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होवून जातीय दंगल होण्याचा धोका होता. पोलीस या प्रकरणात यादव याच्यावर गुन्हा नोंद करणार आहेत.