म्हसळा : रायगडच्या म्हसळा तालुक्यातील मेंडदी येथे शनिवारी रात्री एका 95 वर्षीय वृद्ध महादेव कांबळे आणि त्यांच्या पत्नी 83 वर्षीय विठाबाई कांबळे यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून होता. या हत्येचे गुढ उलगडले असून, प्रॉपर्टीच्या वादामुळे त्यांच्या दोन सख्खे मुलं नरेश महादेव कांबळे (वय 62) आणि चंद्रकांत महादेव कांबळे (वय 60) यांनीच त्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या दोघांना तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांनी घरातील परिस्थितीची पाहणी केली असता, पलंगावर वृद्ध दाम्पत्याची कुजलेला मृतदेह पाहून संशयास्पद मृत्यूची स्पष्ट चिन्हे दिसली. सख्ख्या मुलांनी घरातील प्रॉपर्टीच्या वादातून राग धरला होता आणि हा राग त्यांनी हत्येत रूपांतरित केला, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला.
घटनास्थळी पोहोचलेल्या म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर येडवले, रोहिणकर, पोलीस शिपाई सागर चितारे, राजेंद्र म्हात्रे यांसह फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी सखोल तपास केला. त्यांनी घरातील प्रत्येक खोली, पलंग आणि फर्निचरची तपासणी करत महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले.