गडब : सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहेत. हे आकर्षक आकाश कंदील लक्ष वेधून घेत असून यंदा आकाश कंदिलांचे पारंपरिक आणि काही नवे प्रकार वडखळ, पेण बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यात यंदाही दिवाळीच्या सजावटी साहित्याच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे.
हा सण अधिक खुलतो पणत्या आणि मातीच्या दिव्यांमुळे. देवघरापासून ते अंगणापर्यंत सर्व परिसरात पणत्या लावण्याची प्रथा पाळली जाते. शहरातील विविध बाजारात जागोजागी असे विविध प्रकारचे आकर्षक दिवे विक्रीस दिसून येतात. यामध्ये पाच पणती, डबल प्लेट पणती, कोलकाता पणती, कासव, मासा पणती, चायना मेड पणती अशा वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या पणत्या विक्रीस बाजारात आल्या आहेत.
साध्या पणत्या 20 रुपये, तर आकर्षक पणत्या 150 रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेते रामभरोस शहा यांनी सांगितले. कासव, तसेच मासा पणती, कंदील लाइटची किंमत प्रत्येकी 100 रुपयांच्या घरात आहे. गाय वासरूची मूर्ती 120 रुपयाला तर रेडिमेड किल्लेही विक्रीस आले असून, सोबतीला लहान आकाराचे सैनिकांच्या मूर्ती आहेत.
दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टीकर बाजारात आले आहेत. यात शुभलाभ, स्वतिक, पावले, श्री, ऊँ आणि इतर सजावट साहित्यांचा समावेश आहे. यात कागदी, प्लास्टिक, पीव्हीसी, मेटालिक, अक्रॉलिक अशा अनेक प्रकारात दाखल असून, त्याच बरोबर रांगोळीचे लहान-मोठ्या आकारातील स्टीकर बाजारात आले आहेत. यासह मोती तसेच फुलांचे तोरण, टिकाऊ फुलांची माळ, आकर्षक मेणाचे विविध प्रकारचे दिवे, लायटिंग पणत्यांनी दुकाने सजली असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. रंगीबेरंगी कापडी, हॉलोग्राफी, मार्बल पेपर यासह फोल्डिंगचे असंख्य प्रकारचे आकर्षक आकाश कंदील विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. 100 रुपयांपासून आकाशदिवे उपलब्ध आहेत.
विविध प्रकारच्या पणत्यांचे दर
मातीच्या पारंपरिक पणत्या 70 ते 100 रुपये डझन, गेल्या वर्षी 20 ते 50 रुपये डझनाने महागल्या आहेत. कुंदन पणती : एक जोडी 80 ते 200, गेल्या वर्षी 60 ते 180, दीप माळ : 100 ते 300, गेल्या वर्षी 89 ते 270, चिनी माती पणती : 25 ते 30, गेल्या वर्षी 15 ते 25, कप मेणबत्ती पणती : 70 ते 150 रु डझन, गेल्या वर्षी 60 ते 130, कासव पणती : 40 ते 50 रु., गेल्या वर्षी 25 ते 40, मासा पणती : 40 ते 50, गेल्या वर्षी 30 ते 40, तुळस पणती : 30 ते 40, गेल्या वर्षी 20 ते 30, मातीचे किल्ले : 500 ते 1200, गेल्या वर्षी 400 ते 1000, रांगोळी : पांढरी 20 ते 30 रु., ग्लास रंग : 20 ते 25 रुपये., तोरण : 200 ते 350 रु., स्टिकर : 10 ते 120 रु.