रायगड

Deepavali 2025 : महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या घरगुती फराळाला ग्राहकांची पसंती

रायगड जिल्ह्यात तब्बल २६ लाख १६ हजार ४०० रुपयांची विक्रमी विक्री

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड : रायगड जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या महिला सदस्यांनी गणेशोत्सवात प्रथमच १ लाख ६६ हजार गणेशमुर्तींची निर्मीती करुन १३ कोटी१३ लाख रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा विक्रम राज्यात प्रस्थापिक केल्या नंतर आता याच २५७ महिला स्वयंसहाय्यता गटांच्या महिला सदस्यांनी दिवाळीकरिता दिवाळी फराळ, सजावटीचे साहित्य, कंदील, पणत्या, सुगंधी उटणे यांची निर्मीती करून आतापर्यंत तब्बल २६ लाख १६ हजार ४०० रुपयांच्या मालाची विक्रमी विक्री करून नवा विक्रम प्रस्थापीक केला आहे.

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधुम चालू असून रायगड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील या महिला स्वयंसहाय्यता समुहांनी बनवलेल्या दिवाळी फराळाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांच्या संकल्पनेतून तालुका प्रभाग व ग्राम स्तरावर दिवाळीनिमित्त स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता समूहाने बनवलेल्या दिवाळी फराळ, सजावटीचे साहित्य , कंदील, पणत्या, सुगंधी उटणे यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मुंबई मंत्रालय, कोकण भवन, सीबीडी, बेलापूर व उमेद कार्यालयांत स्टॉल्स

स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने तसेच समूहांचे उत्पन्न वाढीस चालना मिळावी यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुंबई येथे मंत्रालय,कोकण भवन सीबीडी बेलापूर व उमेद कार्यालय येथे सुद्धा महिलांचे दिवाळी फराळाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. स्टॉलला विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात व राज्य अभियान व्यवस्थापन कक्षामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने महिलांना घरगुती फराळाच्या ऑर्डर सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत.

मंत्रालय प्रांगणामध्ये विविध अधिकारी व मंत्रिमंडळातील सदस्यांनी स्टॉलला भेट दिली व महिलांना प्रोत्साहित केले. कोकण भवन येथे कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते या स्टॉलचे उद्घाटन झाले. या प्रसंगी कोकण भवन सीबीडी बेलापूर येथील सर्व अधिकारी वर्गाने आपल्या स्वयंसहाय्यता समूहांनी बनवलेल्या फराळाचा आस्वाद घेऊन मोठ्या प्रमाणात ऑर्डर देवून खरेदी केली.

जिल्ह्यातील २५७ स्वयंसहाय्यता समूहांचा सक्रीय सहभाग

जिल्ह्यात एकूण २५७ स्वयंसहाय्यता समूहांनी ह्यामध्ये सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील प्रभाग संघ स्तरावर व पंचायत समिती प्रांगणामध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने स्टॉलचे आयोजन करण्यात आले. येथेही मोठ्या प्रमाणात महिला स्वयंसहाय्यता समूहांना ग्राहकांचा, अधिकारी वर्गांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला घरगुती चव व महिलांनी बनवलेली रुचकर पदार्थ यामुळे महिलांना दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळत आहेत. महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून या ऑर्डर दिवाळीपूर्वी पूर्ण करून ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT