पुणे

पुणे : जमावबंदी झुगारून पर्यटकांचे ‘टुरटुर’!

अमृता चौगुले

लोणावळा, पुढारीवृत्तसेवा : जिल्हाधिकारी यांनी पर्यटनस्थळांवर लागू केलेल्या जमावबंदी कलम 144 ला लोणावळा शहरात पर्यटकांनी अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मात्र, पोलिसांनी भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटकडे जाणार्‍या मार्गावर नाकाबंदी लावत पर्यटकांना रोखल्याने काही भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळाले.

हवामान खात्याने याबाबत दिलेल्या रेड अलर्ट इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्याच्या विविध भागांतील पर्यटनस्थळे तसेच गडकिल्ले, धरण, लेण्या आदी ठिकाणी 14 ते 17 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी कलम 144 लागू करण्यात आले होते. याबाबत प्रसिद्धी माध्यमे तसेच सोशल मीडियावर बातम्या प्रसारित केल्या जाऊनही त्याकडे दुर्लक्ष करून लोणावळा शहरात मोठ्या संख्येने पर्यटक झाले होते. त्यामुळे एकीकडे धरण, धबधबे, किल्ले याकडे जाण्यापासून या पर्यटकांना रोखणे आणि दुसरीकडे रस्त्यावर झालेली प्रचंड वाहतूककोंडी सोडविणे असे दुहेरी काम करताना पोलिसदल अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे निदर्शनास येते होते. भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर नौसेना बाग याठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीवर सर्वांधिक ताण दिसत होता.

पोलिसांना चकवा देत लुटला आनंद

कामशेत : नाणे मावळातील कोंडेश्वर मंदिर व त्याच्या बाजूला असणार्‍या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी जमावबंदीतही पर्यटक आल्याचे दिसून आले. मावळ तालुक्यातील नाणे मावळ हे पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरत आहे. हिरवेगार डोंगर, नयनरम्य निसर्ग शिवाय रस्त्याच्या बाजूला असणार्‍या डोंगरातून वाहणारे पाणी व धबधबे याचा आनंद घेण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा येथनू पर्यटक आले होते.

कुंडमळा येथे नागरिकांचे 'फिरारे'

देहूरोड : लोणावळ्यातील भुशी डॅम व अन्य पर्यटनस्थळांवर पोलिसांनी जाण्यास मनाई करण्यात आल्यामुळे अनेक पर्यटकांनी घोरवडेश्वर डोंगर आणि कुंडमळा येथे गर्दी केली होती. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तरीही रविवारच्या सुटी दिवशी अनेक पर्यटक भुशी डॅम, ड्युक्स नेक आदी पर्यटनस्थळांवर जमावबंदीचा आदेश जुगारून गेले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT