निवडणुक pudhari
पुणे

राजकारणातील खेळाडूवृत्ती आता लोप पावत चाललीय !

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण नगरे

लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता विधानसभेचा बिगुल वाजणार आहे. सध्या कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून हे जाहीर झाले नसले तरी खालच्या पातळीवरील टीका-टिप्पणी मात्र सुरू झाली आहे. सोशल मीडिया त्यामध्ये तेल ओतण्याचे काम करत आहे. एकंदरीत राजकारणातील खेळाडू वृत्ती आता लोप पावत चालल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

सुरुवातीला शिवसेनेचे दोन गट झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. पक्षनिष्ठा कोठेच राहिलेली दिसत नाही. यापूर्वी राज्यातील राजकारण खेळीमेळीच्या वातावरणात केले जात होते.

कितीही मोठा आणि कट्टर स्पर्धक असला तरी काही दिवस मनात राग व अबोला असायचा. परंतु जसजसे दिवस आणि महिने सरायचे तसे ते पाठीमागील सर्व काही झालेले विसरून एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्रित आणि एका व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेले पहावयास मिळत होते. मात्र आता राजकारणात प्रतिस्पर्ध्याला स्पर्धक न मानता कट्टर शत्रू मानले जात आहे.

आजकालच्या राजकारणात मतभेदाचे रूपांतर मनभेदात होत आहे. त्यातून एकमेकांची जिरवण्यासाठी अतिशय हीन दर्जाचे आणि पराकोटीचे राजकारण केले जात आहे. हे राजकारण समाजाच्या हिताचे नाही अशी चर्चा गावागावात होऊ लागली आहे. राज्यातील राजकारण्यांनी निवडणुकीदरम्यान आपण काय बोलतो आणि किती खालच्या स्तरावर येऊन बोलतो, याचे भान ठेवण्याची आवश्यकता आहे.

घराघरांतील छोट्या-मोठ्या गोष्टी येतात बाहेर

आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय स्पर्धा वाढणार आहे. त्यातून खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी एकमेकांवर होणार आहे. गेल्या लोकसभेला घराघरांतील छोट्या-मोठ्या गोष्टीही चव्हाट्यावर आणून अतिशय खालच्या टोकावर येऊन राजकारण केले जात होते. तेच आता विधानसभा निवडणुकीत देखील पहायला मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT