शरद पवार उद्या विदर्भ दौऱ्यावर  Pudhari File Photo
पुणे

मुख्यमंत्रिपदासाठी आमच्या पक्षातील कोणीही इच्छुक नाही : शरद पवार

पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्रिपदाच्या चेहर्‍यावरून सध्या महाविकास आघाडीत चांगलेच वाक्युद्ध सुरू आहे. अशात मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या पक्षातील कोणीही इच्छुक नाही, असे शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री पदाच्या चेहर्‍यावरून पवार यांना प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, आम्हा कोणालाही मुख्यमंत्रिपदासाठी रस नाही. आम्हाला राज्याला सुशासन द्यायचे आहे, सरकारमध्ये बदल आम्हाला हवा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार किंवा नाही हा माझ्यासाठी प्रश्न नाही. आज लोकांना पर्याय हवा आहे, यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

उद्धव ठाकरेंना शरद पवारच मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत : बावनकुळे

मुख्यमंत्री पदावरून जी व्यक्ती भाजपला दगा देऊ शकते, विश्वासघात करू शकते, ती व्यक्ती आपल्यासोबतही तेच करू शकते, या भीतीने शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना कदापिही मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात हे तीन नेते आजच मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, असा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडीचेदेखील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळेल याबाबत शंका असल्याचे बावनकुळे म्हणाले.

तर आघाडीतील प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो : राऊत

ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा मंत्र कधीच आघाडीच्या सरकारमध्ये यशस्वी होऊ शकत नाही, असे सांगत ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत म्हणाले, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण असले की आघाडीतील प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो. भाजपसोबत युतीत असताना आम्हाला याबाबत अनुभव आलेला आहे. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आमचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून आमच्या जागा पाडल्याचेही राऊत म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT