आळंदी : पांघरायला-अंथरायला घेतलंय... हातात पताका, गळ्यात टाळ घातलाय... समधी बांधाबांध झालीय, अवंदा गर्दी आहे म्हणत्यात... पाऊस बक्कळ हाय बघा; पण पेरण्या रखडल्यात. असो, माउली बघून घेतील ओ..! चला माउलींच्या वारीला..!! असे म्हणत वारकर्यांच्या दिंड्यांनी कधीच गावकुस सोडत आळंदी गाठली आहे. वारकर्यांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेली आहे. राज्याच्या विविध भागांतून गुरुवारी (दि. 19) रात्री आठ वाजता होणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत.
पालिका प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण कारवाई करीत रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. स्वच्छतागृह, मोबाईल टॉयलेट तयार ठेवण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनातर्फे शहरात जवळपास दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. देवस्थानतर्फे सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी वापरण्यात येणारा रथ सज्ज आहे. आषाढी वारीच्या काळात लागणार्या विविध वस्तूंची भांडारगृहात तजवीज करण्यात आली आहे. माउलींसोबत लागणारी वस्त्रे, पूजासाहित्य, अन्नधान्यसाहित्य, अब्दागिरी, तंबू, भांडी यांची पूर्ण स्थितबद्ध यादीच गेल्या दोन महिन्यांपासून तयार आहे. रथाला देखील झळाळी देण्यात आली आहे. खांदेकरी तरुणांना पास देण्यात येणार आहेत. मान्यवर, निमंत्रित व मानकरी यांना पास देण्यात आले असून, पासधारक व्यक्तींनाच मंदिरात सोडण्यात येणार आहे. प्रस्थान सोहळ्याच्या 47 दिंड्यांना मंदिरात सोडण्यात येणार आहे.
सोहळ्यासाठी अलंकापुरीत लगबग सुरू झाली असून, गुरुवारी होणार्या प्रस्थानासाठी आभाळातील मुसळधार पावसाच्या धारांबरोबरच वैष्णवांनी देखील आळंदीत दाटी केली आहे.
गुरुवारी (दि. 19) माउलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे.
पहाटे चार ते साडेपाच : घंटानाद, काकडा, पवमानाभिषेक, पंचामृतपूजा व दुधारती.
पहाटे पाच ते सकाळी नऊ : भाविकांची माउलींच्या चलपादुकांवर महापूजा.
सकाळी सहा ते दुपारी बारा : भाविकांना समाधिस्पर्श दर्शन.
सकाळी नऊ ते अकरा वाजता : वीणामंडपात कीर्तन.
दुपारी बारा ते साडेबारा : गाभारा स्वच्छता व माउलींना महानैवेद्य.
दुपारी बारा ते पाच : भाविकांना समाधिस्पर्श दर्शन.
गुरुवारची श्रींची नित्य पालखी प्रदक्षिणा.
रात्री आठ : प्रस्थान सोहळा कार्यक्रम सुरू होईल. यात श्रीगुरू हैबतबाबा आरती, संस्थानतर्फे आरती, मानकर्यांना नारळप्रसाद, माउलींच्या पादुका पालखीत ठेवण्यात येतील. संस्थानतर्फे मानकर्यांना मानाच्या पागोट्यांचे वाटप, श्रीगुरू हैबतबाबातर्फे नारळप्रसाद, संस्थानतर्फे समाधीजवळ नारळप्रसादाचे वाटप होऊन पालखी वीणामंडपातून प्रस्थान ठेवत महाद्वारातून बाहेर पडते. प्रदक्षिणा मारून गांधीवाडा मंडप या ठिकाणी पालखी मुक्कामी राहते