Pandit Sanjeev Abhyankar interview in Marathi
पुणे: शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्याल गायन आणि भक्तीसंगीत याची तुलना होऊ शकत नाही. कारण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मी जेव्हा गातो त्या वेळी रागाच्या स्वरांमधील एक निर्गुण स्वरचित्र सादर करत असतो. भक्तीसंगीत सादर करताना मी सगुण स्वरचित्र सादर करतो. त्यामुळे शास्त्रीय संगीत आणि भक्तीसंगीत हे दोन्ही भावसंगीतच आहे.
फक्त शास्त्रीय संगीत हे निर्गुण भावसंगीत आहे आणि भक्तीगायन हे सगुण भावसंगीत आहे, दोन्ही प्रकारांमध्ये गाताना खूप आनंद मिळतो आणि रसिकही या दोन्ही संगीत विश्वात रमून जातात. अशा शब्दांत प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांनी शास्त्रीय संगीत आणि भक्तीसंगीतातील बंध उलगडला. (Latest Pune News)
दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूजच्या वतीने गुरुवारी (दि. 3 जुलै) पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरसंजीवन या संगीतमय भक्तीसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. यात पं. संजीव अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या संतरचना ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.
हा कार्यक्रम बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात रंगणार आहे. त्यानिमित्ताने पं. अभ्यंकर यांनी कार्यक्रमात सादर करण्यात येणार्या रचनांविषयी माहिती दिली. पुनीत बालन ग्रुप हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी हे कार्यक्रमाचे फायनान्शिअल पार्टनर आहेत तर बढेकर डेव्हलपर्स हे सहप्रायोजक आहेत.
कार्यक्रमात पं. अभ्यंकर हे अनेक संतांच्या रचना सादर करणार आहेत. सद्गुरूंचे माहात्म्य सांगणारा ’श्रीगुरूसारिखा असतां पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी...’ हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग, श्रीविठ्ठलाचे रूप सांगणारा ’सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...’ हा जगद्गुरू संत तुकाराम यांचा अभंग, पंढरीचे माहात्म्य सांगणारा ’एैसे पंढरीचे स्थान याहूनी आणिक आहे कोण’ हा संत एकनाथ महाराज यांचा अभंग, ’बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल..’ हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग, ’आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलीया, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद...’ हा संत तुकाराम महाराज यांचा संपूर्ण श्रीविठ्ठलाची प्राप्ती झाल्यानंतरचा आनंद व्यक्त करणारा अभंग... अशा विविध संतरचना पं. अभ्यंकर सादर करणार आहेत. यातील बहुसंख्य संतरचना त्यांनी संगीतबद्ध केल्या असून, काही रचना केदार पंडित यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. मराठीसह काही हिंदी संतरचनाही पं. अभ्यंकर गाणार आहेत. विविध आशयाच्या संतरचनांची स्वरानुभूती श्रोत्यांनामिळणार आहे.
पं. अभ्यंकर म्हणाले, ख्याल गायनाच्या कार्यक्रमात शृंगार, विरह, वीर, आनंद, करुण आणि भक्तीरसही सादर केला जातो. भक्तीसंगीताचा कार्यक्रम भक्ती आणि करुणा यावर आधारित असतो. त्यामुळे आपोआपच आनंदरसाचीही निर्मिती होत असते. स्वरसंजीवन कार्यक्रमात भक्ती, करुणा आणि आनंद या तीन रसांचा संगम असणार आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रसिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
1) दैनिक ‘पुढारी’ कार्यालय, मित्रमंडळ चौक, पाटील प्लाझासमोर, पर्वती - सकाळी 10 ते सायंकाळी 5
2) ग्राहकपेठ, टिळक रस्ता - सकाळी 10 ते सायंकाळी 5
कार्यक्रम कधी: गुरुवारी, 3 जुलै
कुठे: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी
वेळ: सायंकाळी 6 वाजता