सारोळा: भोर तालुक्यातील कापूरव्होळ ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी राजीनामा दिला. गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांच्याकडे या सदस्यांनी राजीनामा दिला. सरपंच ग्रामपंचायतीत नसल्यामुळे ग्रामपंचायतीला पोस्टाने राजीनामे पाठविले आहेत.
कापूरव्होळच्या सरपंच मंगल संजय गाडे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत या सदस्यांनी राजीनामा दिला आहे. सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये विश्वासात घेतले जात नाही, आमचे म्हणणे विचारात घेतले जात नाही, ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग बुक तपसावे , ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांची कामाबाबत सखोल चौकशी व्हावी, असे त्यात म्हटले आहे. ग्रामपंचायतीच्या नऊपैकी पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे.
त्यात गुलाब बाळासाहेब गाडे, रोहित सर्जेराव जगताप, शोभा आनंदा गाडे, सविता विवेक गाडे, विनया अनिकेत सपकाळ यांचा समावेश आहे. याबाबत गटविकास अधिकारी धनावडे म्हणाले, पाच सदस्यांचा राजीनामा सरपंचाना देणे गरजेचे आहे.
संबंधितांचा राजीनामा ग्रामपंचायतीला मंजुरीसाठी पाठविणार आहे. ग्रामपंचायतीत राजीनामे देण्यासाठी गेलो असता सरपंच व ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे राजीनामे पोस्टाने पाठविला आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशीसाठी गटविकास अधिकार्यांना पत्र दिले आहे, असे रोहित जगताप यांनी सांगितले.