संतोष वळसे पाटील
मंचर: गेल्या काही दिवसांत आंबेगाव तालुक्यातील जनतेची विविध शासकीय कार्यालयात असलेली छोटी, मोठी कामे मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी आमदार दिलीप वळसे पाटलांकडे मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने नेहमी संयमी भूमिका घेणारे वळसे पाटील यांनी आता कठोर व्हावे व जनतेची कामे न करणार्या शासकीय अधिकार्यांच्या प्रसंगी बदल्या कराव्यात, अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेकडून होऊ लागली आहे.
आंबेगाव तालुक्यात विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली असली तरी महसूल विभाग, भूमी अभिलेख, पंचायत समिती विभाग, कृषी, महावितरण, पोलिस, वन खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादी विभागासंदर्भात अनेक नागरिक, शेतकर्यांच्या विविध समस्या आहेत.
आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दर रविवारी अनेक अधिकारी, कर्मचारी आमचे काम करत नाही, करायचे ठरले तर पैशांची मागणी करतात, निवेदनाला उत्तर देत नाहीत, अशा तक्रारी वारंवार प्राप्त झाल्या आहेत. अखेर वळसे पाटलांनी शुक्रवारी (दि.11) घोडेगाव येथे या सर्व प्रश्नांच्या बाबतीत सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकार्यांबरोबर बैठक घेत जनता दरबाराचे आयोजन केले होते.
या जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. आपल्या समस्या थेट वळसे पाटलांनी ऐकल्याने अनेक नागरिकांना देखील समाधान वाटले. मात्र छोट्या छोट्या कामासाठी अधिकारी जनतेला वेठीस धरत असल्याचे वळसे पाटलांचा देखील लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आता प्रशासनात आलेली मरगळ झटकविण्यासाठी आता कठोर झाले पाहिजे. अन्यथा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वालीच कोणी उरला नाही, अशी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.
वळसे पाटील घेणार दर शुक्रवारी आढावा बैठक
घोडेगाव येथे दर शुक्रवारी आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.