पुणे: संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून केवळ उर्वरित रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणे आवश्यक आहे. अतिरिक्त शिक्षक असताना व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास अशा संस्थांच्या जाहिराती व प्रत्यक्ष रिक्त पदे यांची खातरजमा तातडीने करावी, असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांना दिले आहेत.
सिंह यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ज्या संस्थांच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत, त्या संस्थांमधील संच मान्यता 2024-25 प्रमाणे मान्य, कार्यरत व रिक्त पदांचा तपशील विचारात घेण्यात यावा. पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
पद मंजूर नसताना अशा प्रकारची पदभरतीची कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रूजू करून घेता येत नाही. त्यामुळे शाळांमधील पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती आलेल्या आहेत तसेच येत आहेत, त्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये 2024-25 नुसार मंजूर पदे पडताळून पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करावी. पोर्टलवर जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही मंगळवारी (दि.15) पूर्ण करावी, असेदेखील स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी.
शिक्षण सेवक पदांसाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या द़ृष्टीने शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी, विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही केलेली आहे.
त्यामध्ये मुलाखतीशिवाय 15 हजार 63 आणि मुलाखतीसह दोन हजार 771 अशा एकूण 18 हजार 34 पदांकरिता उमेदवारांच्या नियुक्तीकरिता पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे. आता पवित्र पोर्टलवर 20 जानेवारी 2025 पासून दुसर्या टप्प्यातील नव्याने जाहिरातीची कार्यवाही सुरू केली आहे.
पोर्टलवर विविध व्यवस्थापनांच्या जाहिराती येत आहेत. 2024-25 च्या संचमान्यतांची कार्यवाही झाली आहे. त्यामुळे 2024-25 च्या संचमान्यतेमध्ये पदे कमी, अधिक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापनांकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिक्त पदे आणि जाहिराती यांची खातरजमा करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दोन्ही संचालकांना दिले आहेत.