देशाला दिशा देणार्या महाराष्ट्राची भाषा अत्यंत खालच्या थराला गेली आहे. राजकारणी खालच्या थराला जाऊन बोलत आहेत. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. राजकारणी व्यक्तींना साहित्य संमेलनांमध्ये बोलायला नाही, तर ऐकायला बोलवावे, असे सांगून पूर्वीच्या मराठी साहित्यिकांच्या अंगात, मनात मराठी बाणा रुजलेला दिसत होता. परंतु, ती धमक आज कमी झालेली जाणवत असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवारी राज ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची ओळख दर्शविणारी राजमुद्रा व लेखणी, असे बोधचिन्हाचे स्वरूप आहे. या प्रसंगी सरहद पुणेचे अध्यक्ष संजय नहार, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रकाश पागे, गुरय्या स्वामी, डॉ. शैलेश पगारिया आदी उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, सद्य:स्थितीत महाराष्ट्रातील राजकारणाची भाषा अत्यंत खालच्या थराला गेली आहे. अशा परिस्थितीत साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे. साहित्यिकांनी ट्रोल होण्याचा विचार न करता अधिकारवाणीने बोलायला हवे. मराठी साहित्याच्या वाढीसाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, मदत लागेल ती करू. महाराष्ट्रात चाललेला जो खेळ, सर्कस झालीय, कुणी विदूषकी चाळे करत आहे. मंत्रालयात कुणी जाळ्यांवर उडी मारत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक लोक आहेत त्यांना जाळ्यांशिवाय उड्या मारायला लावले पाहिजे. देशाला दिशा देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे.
संजय नहार म्हणाले, मराठी अस्मितेचा विषय ज्या वेळी येतो त्या वेळी राज ठाकरे हे कायम पुढे असतात. दिल्ली काबीज करायची आजही मराठी माणसात कुवत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.