mPSC Exam  File Photo
पुणे

एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा आता 1 डिसेंबरला

पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 ही आता 1 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्यात येणार असून, उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली.

एमपीएससीतर्फे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 या परीक्षेचे आयोजन 25 ऑगस्टला करण्यात आले होते. परंतु त्याच दिवशी आयबीपीएसचीही परीक्षा होती. त्यामुळे दोन स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी नको तसेच परीक्षेत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. या आंदोलनाला राजकीय वळण लागले होते, त्यामुळे राज्य शासनाने ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली होती. त्यानंतर एमपीएससीकडून संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 कधी आयोजित केली जाणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार 29 डिसेंबर, 2023 रोजी विविध संवर्गाच्या एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली. राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धिपत्रक 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर कृषी विभागाने 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कृषी सेवा 2024 साठीच्या 258 पदांचे मागणीपत्र आयोगाला दिले. या पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती.

आयोगाची 23 सप्टेंबर, 2024 रोजी बैठक झाली. महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषी सेवेतील पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करण्याबाबतचे शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यानुसार संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 ही परीक्षा 1 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT