सोयाबीनच्या 62 टक्के, तर कापसाच्या 58 टक्के पेरण्या पूर्ण
मका, उडीद पेरण्यांचा टक्का चांगला
पुणे: राज्यात पावसाने उघडीप दिल्याने वाफसा येऊन संबंधित जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढण्यास मदत झाली आहे. राज्यात सद्य:स्थितीत 76 लाख 30 हजार 718 हेक्टर म्हणजे सरासरीच्या 53 टक्के क्षेत्रावरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
राज्यात खरिपात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनच्या 62 टक्के, कापसाच्या 58 टक्के, मका पिकाची 86 टक्के, उडीद 66 टक्क्यांइतक्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, या क्षेत्रात पुढील पंधरवड्यात आणखी वाढ अपेक्षित असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.
राज्याचे खरीप हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र 144 लाख 36 हजार 54 हेक्टरइतके आहे. कृषी आयुक्तालयाने सुमारे 150 लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्यांचे नियोजन केले आहे. त्यादृष्टिने क्षेत्रीय स्तरावर बि-बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच शेतकर्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा होण्यासाठी भरारी पथके नेमून तपासण्यांचे कामही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात पाच जिल्ह्यांत सर्वाधिक पेरणी झाल्याचे 27 जूनअखेरच्या कृषी विभागाच्या ताज्या अहवालातून दिसून येत आहे. त्यामध्ये लातूर 79 टक्के, धाराशिव 76 टक्के, छत्रपती संभाजीनगर 76 टक्के, सोलापूर 76 टक्के आणि जालना 70 टक्के या जिल्ह्यांचा समावेश आहे. कमी पेरणी झालेल्या पाच जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने ठाणे 0.2 टक्के, भंडारा 1 टक्का, गोंदिया 2 टक्के, पालघर 6 टक्के आणि रायगड 7 टक्के यांचा समावेश आहे.