पुणे

वाल्हे बाजारात सुविधांची वानवा

अमृता चौगुले

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस लोकसंख्येतील वाढीने वाल्हे (ता. पुरंदर) येथील आठवडे बाजारात कोंडी वाढत आहे. बाजार वाढत असून, याकरिता स्थानिक प्रशासनाने वाढत्या बाजारातील शेतकरीवर्ग, ग्राहक, व्यापारीवर्गाला मूलभूत सुविधा पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे हे 6,500 लोकसंख्येचे गाव पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर आहे. येथील आठवडे बाजार मंगळवारी भरत असून वाल्हे परिसरातील मांडकी, हरणी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी पिंगोरी, दौंडज, जेऊर, पिसुर्टी, राख या गावातील शेतकरी, ग्राहक या बाजारामध्ये येतात.

मुख्यत्वे करून गावातील व्यापारी तर काही प्रमाणात बाहेर गावचे व्यापारी येत असतात. परिसरातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीस आणतात. बाजार वाल्हे गावठाणमधील मुख्य पेठेत भरत असल्याने स्थानिक किराणा व भुसार मालाचे व्यापारी आपापला माल विक्रीस ठेवतात. ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच आरओचे पिण्याचे स्वच्छ पाणी स्वस्त दरात (5 रुपयांत 20 लिटर) उपलब्ध केले आहे.

आठवडे बाजारात जरी कोंडी वाढत असली तरी, हा बाजार गावच्या बाहेर जाऊ नये, असे स्थानिक व्यावसायिकांना वाटत आहे. बाजार याच ठिकाणी राहावा असे जवळपास सर्वच जाणकारांचे मत आहे. बाजारात कुठेही गाडी पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी, ग्राहक, व्यापारीवर्गाला गाडी पार्किंग करताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. पूर्वी मिरची व्यापारासाठी सुप्रसिद्ध असणारे वाल्हे गाव कालानुरूप वातावरणातील बदलामुळे व मिरचीचे क्षेत्र घटल्याने मुख्य व्यापारपेठ म्हणून राहिले नाही. लवकरच वाल्हे- निरा महामार्गालगत भेंडी बाजार येथे अत्याधुनिक बाजारसंकुल उभारण्याच्या कामाचे नियोजन सुरू आहे.

बाजारपेठेत ग्रामपंचायतीला जागा उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणी स्वच्छतागृह बांधता येत नाही. बाजारपेठेतच्या बाजूला वाल्हे- मांडकी रोडलगत स्वच्छतागृह बांधलेले आहे. याचा वापर थोड्याफार प्रमाणात होताना दिसत आहे.
                                                                           –   अमोल खवले, सरपंच, वाल्हे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT