बिबट्यांचे मानवी हल्ले कमालीचे वाढले
एकतर मानवाला राहू द्या अथवा बिबट्यांना
तातडीच्या अंमलबजावणीची गरज
बापू रसाळे
ओतूर : लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणी मंडळींनी गाजावाजा केलेला जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथील प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्प आता कोठे गायब झालय? यावर विद्यमान लोकप्रतिनिधींसह सर्वच राजकीय मंडळींनी चुप्पी साधली असून, त्यामुळे बिबट्यांचे मानवावरील हल्ले दिवसेंदिवस कमालीचे वाढले आहेत. (Latest Pune News)
अद्यापही केवळ कागदावरच प्रलंबित असलेला हा बिबट सफारी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची तसेच बिबट्यांच्या उग््रा समस्येकडे खासदार-आमदार यांच्यासह सर्वच राजकीय मंडळींनी गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जुन्नर तालुका हा बिबट्यांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखला जाऊ लागला आहे. दररोज कुठे ना कुठे मानवावर, पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. बिबट्यांमुळे मानवाला शेतात काम करणे आणि गावात राहणे मुश्कील झाले आहे.
या भागातील उसाचे शेत आणि नैसर्गिक अधिवासामुळे बिबट्या आणि मानवाचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. बिबट्यांची संख्या अलीकडच्या काळात ओतूर आणि परिसरासह संपूर्ण जुन्नर तालुक्यात बेसुमार वाढली आहे. आंबेगव्हाण येथील बिबट सफारी प्रकल्प सुरू झाल्यास सर्व बिबट्यांना नैसर्गिकरीत्या सुरक्षित अधिवास मिळेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल; ज्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
परंतु, आता निवडणुका संपल्याने या विषयातील राजकारण्यांचा रसही संपलेला दिसत आहे. राज्य मंत्रिमंडळाने जुन्नर येथील बिबट सफारी प्रकल्पासाठी 80.43 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सुमारे 50 हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे; ज्यापैकी 30 हेक्टर क्षेत्र विशेषतः सफारीसाठी वापरले जाईल. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय प्राणिसंग््राहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. याच मंजुरीच्या प्रतीक्षेत हा संपूर्ण प्रकल्प अडकून पडला आणि ती मंजुरी आणण्याबाबत काय हालचाली सुरू आहेत? हे समजायला काही मार्ग उरला नाही.
आज मानवाच्या जीविताची शाश्वती मात्र या बिबट्यांमुळे राहिलेली नाही, अशी स्थिती आहे. सद्य:स्थितीत बिबटे गल्लीबोळात फिरू लागले आहेत. कुत्र्यांना व डुकरांना भक्ष्य करताना बंगल्यांचीही राखण करू लागले आहेत. या प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्यास ते मानवावर हल्ला करून ठार करू लागले आहेत. लहान मुलाना ते टार्गेट करू लागले आहेत.
बिबट सफारी प्रकल्प रखडल्यामुळे बिबट्या आणि मानवामधील संघर्ष कमी होत नसल्याचे चित्र आहे. ओतूर-जुन्नर परिसरात बिबट्यांकडून पाळीव प्राणी आणि मानवावरही हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतीत काम करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. हा प्रकल्प अद्यापही लाल फितीत अडकला आहे. निधी मंजूर होऊनही जर हा प्रकल्प सुरू होत नसेल, तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस विलंब करणे म्हणजे मानवी आणि वन्यजीव दोघांच्याही जिवाला धोका निर्माण करण्यासारखे आहे.
सरकारने आता केवळ घोषणा न करता, या प्रकल्पाच्या कामाला गती देणे आणि नागरिकांना दिलासा देणे आवश्यक आहे. जुन्नरच्या आंबेगव्हाण येथील बिबट सफारी कधी सुरू होणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. एकतर बिबट्या गावात राहू द्या अथवा मानवाला राहू द्या, अशी देखील भावना जनसामान्य लोकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी बिबट्यांच्या बंदोबस्ताकामी तातडीची अंमलबजावणी गरजेची आहे.