पुणे

… तर संलग्नता गमवावी लागेल ! उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शैक्षणिक संस्थांना इशारा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मातृभाषेतून शिक्षण, कौशल्य, रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षण, भारताच्या उज्ज्वल ज्ञानपरंपरेचा वारसा आणि नीतिमत्तेचे शिक्षण या चार मुख्य घटकांवर आधारित नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी 2020) आहे. धोरण नीटपणे समजून घेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात संस्थाचालक व प्राचार्यानी पुढाकार घ्यावा. पुढील वर्षांपासून 'एनईपी 2020' लागू न करणार्‍या संस्थांना, महाविद्यालयांना संलग्नता गमवावी लागणार आहे, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिला.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि पुणे विद्यार्थी गृहाच्या वतीने संस्थाचालक व प्राचार्यांसाठी 'एनईपी 2020'वर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनावेळी पाटील बोलत होते.

'उच्च शिक्षणाच्या खासगी संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात व्यवस्थापनाची भूमिका' अशी या चर्चासत्राची संकल्पना होती. 'एआयसीटीई'चे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीतारामन, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिल्यास विषय व संकल्पना समजून घेता येतात. विद्यार्थ्यांच्या शोधकवृत्तीला आणि सृजनशीलतेला चालना मिळते. संशोधनाला चालना मिळून बौद्धिक संपदा हक्क अधिक प्रमाणात मिळविता येतात. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी विषयाची पुस्तके मराठीतून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. औद्योगिक क्षेत्राला नेमके काय हवे, यानुसार अभ्यासक्रम विकसित करण्याची मुभा आहे. शिक्षण मंडळ आणि विद्यापीठांना लवचिक राहावे लागणार आहे. शिक्षणाचा निम्मा भाग उद्योग भेटींच्या केंद्रित असला पाहिजे. विद्यार्थी, प्राध्यापक यांनी उद्योगांना भेटी देणे गरजेचे आहे.

प्रा. टी. जी. सीतारामन म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून संशोधन, इनोव्हेशन, उद्योजकता वाढीला लागावी, या दृष्टीने अभ्यासक्रमांची रचना केली जात आहे. मातृभाषेतून शिक्षणाची मुभा दिली असून, सर्व प्रादेशिक भाषांमध्ये पाठ्यपुस्तके निर्मिली आहेत. ग्रामीण भागात ज्ञानाची ही गंगा पोहोचवण्यासाठी हे धोरण महत्त्वाचे ठरेल. डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, शिक्षण धोरणाबाबत महाराष्ट्र प्रभावीपणे काम करत आहेत. गेल्या तीन वर्षांत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने बरीच प्रगती केली आहे. या वेळी रेडेकर यांनी पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्याची माहिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT