भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : ऊसदराची स्पर्धा झाली पाहिजे, अशी ऊस उत्पादक शेतकर्यांना नेहमीच अपेक्षा असते. या वर्षी श्री छत्रपती कारखान्याने तीन हजार रुपयांची एकरकमी पहिली उचल जाहीर करून साखर कारखान्यांमध्ये ऊसदराची स्पर्धा निर्माण केली आहे. श्री छत्रपती कारखान्याने तीन हजार रुपयांची पहिली उचल जाहीर केल्यानंतर इतर साखर कारखान्यांच्या पहिल्या उचलीकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता कमी असल्याने साखर कारखान्यांनी इतर साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसावर डोळा ठेवून गाळप हंगामाच्या सुरुवातीपासूनच उसाची पळवापळवी सुरू केली आहे. श्री छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून इतर साखर कारखान्यांना गाळपसाठी जाणारा ऊस रोखण्यासाठी कारखान्याने तीन हजार रुपयांची पहिली उचल जाहीर करून इतर साखर कारखान्यांच्या ऊसदराला चपराक दिली आहे. कारखान्याच्या इतिहासातील ही उच्चांकी पहिली उचल आहे.
संबंधित बातम्या:
इंदापूर तालुक्यातीलच कर्मयोगी व निरा-भीमा कारखान्यांनी सुरुवातीला 2 हजार 500 रुपये पहिली उचल जाहीर केली होती. नंतर त्यांनी 2 हजार 700 रुपये जाहीर केली. छत्रपती कारखान्याने सुरुवातीला 2 हजार 900 रुपये उचल जाहीर केली होती. नंतर 3 हजार रुपये एकरकमी जाहीर केली. श्री छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून सोमेश्वर, माळेगाव, बारामती अॅग्रो तसेच सातारा जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांना गाळपसाठी मोठ्या प्रमाणात ऊस जात होता; परंतु छत्रपती कारखान्याने तीन हजार रुपयांची पहिली उचल जाहीर केल्याने ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
माळेगाव, सोमेश्वर, बारामती अॅग्रोकडे लक्ष
छत्रपती कारखाना इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत ऊसदराच्या बाबतीत स्पर्धेला टिकणार नाही, असे ऊस उत्पादकांना वाटत होते. परंतु, उच्चांकी उचल जाहीर करून छत्रपती कारखान्याने इतर साखर कारखान्यांमध्ये आता ऊसदराची स्पर्धा निर्माण केली आहे. इतर साखर कारखाने आता छत्रपती कारखान्याच्या तुलनेत पहिली उचल किती जाहीर करतात, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. माळेगाव, सोमेश्वर, बारामती अॅग्रो या साखर कारखान्यांनी अद्याप पहिली उचल जाहीर केलेली नाही. त्यामुळे गाळपासाठी ऊस देण्यामध्ये ऊस उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.