‘नॅनो क्रिस्टल’चा शोध Pudhari Photo
पुणे

केसांपेक्षाही 10 पट सूक्ष्म ‘नॅनो क्रिस्टल’चा शोध

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आशिष देशमुख

क्ष-किरण तंत्रज्ञान, अवकाशयान, इलेक्ट्रॉनिकसह अनेक क्षेत्रांना वरदान ठरेल, असे क्रांतिकारी संशोधन पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी केले आहे. पेरॉक्साईट मटेरियलपासून त्यांनी आपल्या केसापेक्षाही दहापट आकाराने अतिसूक्ष्म कण (नॅनो क्रिस्टल) तयार केले आहेत. त्याचा फायदा क्ष-किरण (एक्स-रे) ओळखण्यासाठी होणार आहे. अवकाशयानात या संशोधनची भूमिका मोलाची ठरू शकते.

संशोधनाचा उपयोग काय?

  • क्ष-किरण तंत्रज्ञानाची अचूकता अनेक पटींनी वाढू शकते.

  • शरीराच्या कोणत्याही भागाचे स्कॅनिंग केले तर तेथे झालेले अतिसूक्ष्म (हेअरलाईन) फ्रॅक्चर, लागलेला मुका मार, विसंगती सुस्पष्ट दिसेल.

  • अंतराळात गेल्यावर शास्त्रज्ञ क्ष-किरणांचा वापर करून तेथील हवा, पाणी, माती यांचे निरीक्षण करतात. त्यासाठी मोठे यंत्र न्यावे लागते. या संशोधनामुळे त्या यंत्राचा आकार अतिसूक्ष्म असा होऊ शकेल.

  • यानाची निर्मिती करताना विविध ठिकाणी उपयोग.

  • सुरक्षा यंत्रणेत विमानतळांवर जे स्कॅनिंग केले जाते ते अधिक सुस्पष्ट व अतिवेगवान होणार.

  • मानवी शरीरासह जवळच्या साहित्यातील सर्वच वस्तूंचे सुस्पष्ट स्कॅनिंग करण्याची क्षमता वाढू शकते.

या अतिसूक्ष्म कणांत साठवण क्षमताही

आढळल्याने पेनड्राईव्हपेक्षा वेगळे अन् प्रचंड साठवण क्षमता असणारे तंत्रज्ञान विकसित होऊ शकते. पुण्यातील पाषाण भागात राष्ट्रीय विज्ञान संस्थेतील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अतिकुर रहमान यांनी हा शोध लावला आहे. प्रा. डॉ. पवनकुमार, (आयसर, पुणे), प्रा. डॉ. गौतम शेठ (आयसर, मोहाली), प्रा. डॉ. सुयॉन ह्वांग ब्रुकहेवन, राष्ट्रीय प्रयोगशाळा, अमेरिका हे सहसंशोधक आहेत. हा शोधनिबंध अ‍ॅडव्हान्स मटेरियल्स या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला. या संशोधकांनी दावा केला आहे की, हे संंशोधन जगात प्रथमच झाले असून, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करताना मोठा फायदा होणार आहे. नव्याने संशोधित केलेल्या सूक्ष्म कणांत ऑप्टो-इलेक्ट्रॉनिक गुणधर्म आहेत. त्यामुळे हे अतिसूक्ष्म कण प्रकाशाचे गुणधर्म अचूकपणे ओळखतात. यात प्रकाश उत्सर्जक डायोड आढळल्याने क्ष-किरण तंत्रज्ञानासह अवकाशयानात मोठी भूमिका हे संशोधन बजावू शकते.

असे दिसले प्रकाश उत्सर्जक डायोड...

प्रा. डॉ. रहमान यांच्या पुणे आयसर येथील प्रयोगशाळेला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा हे अतिसूक्ष्म पेरॉक्साईट क्रिस्टल डिजिटल सूक्ष्मदर्शकाखाली दाखवले. सूक्ष्मदर्शकातून निळा प्रकाश सोडला असताना दुर्बिणीतून एक चौरस सें.मी.मध्ये लाखो अतिसूक्ष्म कण हिरव्या रंगात चमकताना दिसले. याचा गुणधर्मच त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितला. या अतिसूक्ष्म कणांत प्रकाश उत्सर्जनाची मोठी क्षमता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT