पुणे : उमेदवारीसाठी अखेरपर्यंत झालेल्या अटीतटीच्या लढाईत पुणे कॅन्टोमेन्ट मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी मंत्री रमेश बागवे तर शिवाजीनगर मतदारसंघातून माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी बाजी मारली. पक्षातून बाहेरून आलेल्या इच्छुकांना संधी न देता काँग्रेसने बहिरट आणि बागवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.
काँग्रेसच्या सलग दोन उमेदवारी यादी जाहीर होऊनही शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोमेन्ट मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाली नव्हती. शिवाजीनगरमध्ये बहिरट आणि पक्ष प्रवेश न केलेले सनी निम्हण यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच झाली. नक्की कोणाला उमेदवारी द्यायची? याचा तिढा दिल्लीपर्यंत कायम होता. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत होता. मात्र, अखेरच्या टप्यात पक्षातील उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे निम्हण यांचा पत्ता कट झाला आणि बहिरट यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे आता शिवाजीनगरमध्ये पुन्हा भाजपचे सिध्दार्थ शिरोळे विरुध्द काँग्रेसचे बहिरट असाच सामना रंगणार आहे.
तर पुणे कॅन्टोमेन्ट मतदारसंघातही बागवे आणि शिवसेना ठाकरे गटातून काँग्रेसवासी झालेले अविनाश साळवे यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा झाली होती. बागवे यांच्या उमेदवारीला पक्षातील विरोध झाल्याने साळवे अथवा तिसरा पर्याय म्हणून लता राजगुरू यांच्याही नावाचा पर्याय पुढे करण्यात आला होता. त्यातच बागवे भाजप नेत्यांच्या भेटल्याच्या चर्चा झाली. त्यामुळे त्यांची उमेदवारी कट होणार का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या चार दिवस दिल्लीत तळ ठोकून बागवे यांनी उमेदवारी खेचून आणली. आता पुणे कॅन्टोमेन्टमध्येही पुन्हा भाजपचे सुनिल कांबळे आणि काँग्रेसचे बागवे अशीच लढाई होणार आहे.