निरा रेल्वेस्थानक Pudhari
पुणे

निरा रेल्वेस्थानकात पुणे, मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक असलेल्या निरा रेल्वेस्थानकात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार न करता गेल्या दोन वर्षांपासून पुणे, मुंबई, नागपूरकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या प्लॅटफॉर्म नसलेल्या रेल्वेट्रॅकवर थांबविण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना ऊन, वारा, पावसाचा त्रास सोसत ताटकळत उभे राहावे लागते. गाडीत बसताना प्रवाशांना पायर्‍या चढता येत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे, अपघाताचीही शक्यता आहे. दोन वर्षांपासून निरा रेल्वेस्थानकात पुणे, मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म बांधण्याची मागणी होत आहे, मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार व हलगर्जीपणामुळे आजपर्यंत प्लॅटफॉर्म झाले नाही. प्लॅटफॉर्म नसलेल्या रेल्वेट्रॅकवर प्रवाशांना बसण्याकरिता व सावलीकरिता पुरेशी सुविधाही नाही. निरा रेल्वेस्थानकातून कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस व विविध विनाथांबा एक्स्प्रेस गाड्या तसेच पुणे, कोल्हापूरकडे जाणार्‍या पॅसेंजर व डेमू गाड्या धावत असतात. निरा रेल्वेस्थानकात पुणे, मुंबई, गोंदिया, सातारा, कोल्हापूरकडे जाणार्‍या व येणार्‍या प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते.

या स्थानकामधून प्रवासी उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळत असते व आसन आरक्षित करणार्‍यांची संख्या मोठी आहे. निरा रेल्वेस्थानकात कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांना जेमतेम एक ते दोन मिनिटांचा थांबा आहे. सध्या पावसाळ्यासह सणासुदीचे दिवस असल्याने पुणे, मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांची तोबा गर्दी असते. प्लॅटफॉर्म नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वेगाडीत बसावे लागते. दरम्यान, मध्यंतरी निरा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म बांधण्याच्या हालचाली दिसत होत्या. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ते थांबले गेल्याचे समजते. मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी निरा रेल्वेस्थानकात प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी. निरा रेल्वेस्थानकात पुणे, मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांसाठी नवीन प्लॅटफॉर्म बांधावा, अशी जोरदार मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT