लोणावळा : मागील दोन दिवसांत शहरातील विविध भागात बेकायदेशीररित्या दारू विक्री करणार्या 6 जणांविरोधात तर गांज्यासारख्या अंमली पदार्थांचे सेवन करणार्या 2 जणांविरोधात लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन दिवसांत विविध ठिकाणी छापे मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरात अवैध धंद्यास आळा बसविण्याकरिता लोणावळा शहर पोलिस ठाण्याकडून गुन्हे शोधपथक व गुप्त बातमीदार नेमून त्यांच्यामार्फत माहिती काढून अवैध धंद्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी मागील दोन दिवसांत विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.
64 हजार 230 रुपयांचा माल हस्तगत
यात तुंगार्ली गावातील काच बंगल्यासमोर असलेल्या सेंट किराणा दुकानाच्या मागे, वलवण येथील हॉटेल सेंटर पॉईंटच्या पाठीमागील भिंतीचे आडोशास, वलवण ब्रीजच्या खाली कुणाल बारच्या भिंतीच्या आडोशास, ठोंबरेवाडी येथील रोडच्याकडेला बेकायदा देशी-विदेशी दारुची विक्री केली जात होती.
या प्रकरणी परशुराम निकम (वय 50, रा. हनुमान टेकडी, लोणावळा), नंदकुमार शिवराम घाडगे (वय 63, रा. हॉटेल सेंटर पॉईंट, वलवण, लोणावळा), धीरज गुरुनाथ शिंदे (वय 21, रा. महादेव मंदिराजवळ, वलवण, लोणावळा) व मनोज मनोहर घारे (वय 42), सागर अशोक काळे (वय 29), नंदू भरत शिंदे (वय 50) आणि गौरव सुरेश गवळी (वय 40, सर्व रा. ठोंबरेवाडी, लोणावळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, 64 हजार 230 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
लोणावळा पोलिसांची अवैध धंद्यावरील कारवाई सुरू असतानाच गावठाण येथील भूत बंगल्याचे परीसरात चिराग अशोक देवरा (वय 21, रा. सिंहगड कॉलेजजवळ, कुसगाव ता. मावळ) आणि प्रियांशु ऊर्फ किट्टू प्रेम उठवाल (वय 21, रा. सिध्दार्थनगर, लोणावळा) या दोघांना बेकायदेशीरपणे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना पकडून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंद्याची माहिती देण्याचे आवाहन
उपविभागीय सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सत्र सुरू आहे. लोणावळा शहर व आजूबाजूच्या परिसरात चोरून अवैध धंदे करणार्यांची माहिती पोलिसांना कळवावी व माहिती देण्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.