पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बेल्हे ते मंचर रस्त्यावर रांजणी हद्दीत पीरसाहेबवस्तीत वळणावरील रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी रांजणीच्या सरपंच छाया बंडेश वाघ यांनी केली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे ते रांजणीमार्गे मंचर हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून सतत लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. रांजणी गावात पीरसाहेबवस्तीत रस्त्यावर मोठे वळण आहे. हे वळण धोकादायक बनले आहे. या वळणाच्या ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक बसविलेले नाहीत. त्यामुळे वाहने भरधाव वेगाने धावतात.
अनेकदा वाहनचालकांचा येथे वाहनांवरील ताबा सुटतो. अवजड वाहनांचा वेग सहजासहजी कमी करता येत नाही. त्यामुळे येथे अपघात होतात. गतवर्षी याच वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पीरसाहेब मंदिरावर जाऊन धडकले होते.
यामध्ये मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गुरुवारी (दि. 13) रात्री ऊस वाहतूक करणार्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक या वळणावर पलटी झाला. दिवसेंदिवस या वळणावर अपघातांची संख्या वाढत चालली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पीरसाहेबवस्तीत रस्त्यावर दोन्ही बाजूला त्वरित गतिरोधक बसवावेत, अशी मागणी सरपंच छाया बंडेश वाघ, संदीप घायतडके, किरण घायतडके यांच्यासह स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.