पुणे

पुणे : 53 लाख उकळणार्‍या दोघींवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करणार्‍या दोन महिलांनी 53 लाख 62 हजारांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघींवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा अविनाश राजपूत (रा. पुणे) आणि शीतल उद्धवराव गोब—ागडे (रा. सासवड, कात्रज रोड, उंड्री) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघींची नावे आहेत. याबात दिलीप रिकबचंद ओसवाल (59, रा. गॉड्स गिफ्ट सोसायटी, मंगलदास रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

हा प्रकार डिसेंबर 2020 ते 23 जुलै 2022 दरम्यान वाघोली येथील सिल्व्हर क्रेस्ट या गृहप्रकल्पाच्या सेल्स ऑफिसमध्ये घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसवाल हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा वाघोली येथे सिल्व्हर क्रेस्ट नावाचा गृहप्रकल्प आहे. येथील सेल्स ऑफिसमध्ये हर्षदा आणि शीतल या सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करत होत्या.

हे काम करत असताना त्यांना देण्यात आलेल्या रिसीट बुकचा त्यांनी परस्पर वापर करून सदनिका बुक करण्यासाठी आलेल्या सदनिकाधारकांना सदनिका बुक केल्यानंतर करारनाम्याच्या नमूद रकमेपेक्षा अधिक रक्कम घेतली. त्यांना रिसीट बुक स्वतःच्या स्वाक्षरीने देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकूण 12 फ्लॅटधारकांकडून 53 लाख 62 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. दरम्यान, हा प्रकार ओसवाल यांच्या लक्षात आल्यानंतर सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी व त्यांचीही फसवणूक झाल्याने त्यांनी दोघींविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT