Pune News: खडकवासला धरणसाखळीत ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने दोन टीएमसी पाण्याची भर पडली आहे. पुणे शहर परिसराला मुबलक पाणी सोडून दोन टीएमसी पाण्याची तूट भरून निघून धरणसाखळीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता 28.56 टीएमसी (97.97 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा दीड टीएमसीपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी धरणसाखळीत 26.96 टीएमसी (92.50 टक्के) इतके पाणी होते.
यंदा परतीच्या पावसाचा धरणसाखळीला लाभ झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्यासह शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धरणसाखळीतील चारही धरण क्षेत्रांत यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धरणसाखळीला चांगला हातभार लावला.
पानशेत, वरसगावसह मुठा सिंहगड खोर्यांत सध्या पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी दाट धुके व कडकडीत उन्हाबरोबर दुपारी ढग दाटून येत आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता आहे. वरील दोन्ही धरणांतून पाणी सोडले जात असल्याने, तसेच ओढे-नाल्यांतून पाण्याची मंद आवक सुरू असल्याने खडकवासला धरणातील पाण्याची पातळी पुन्हा शंभर टक्क्याकडे वाटचाल सुरू आहे.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये पडलेल्या परतीच्या पावसामुळे सोडण्यात येणार्या पाण्याची तूट भरून निघाली आहे. महिनाभरात जवळपास दोन टीएमसीची भर धरणसाखळीत पडली आहे. याचा प्रत्यक्ष लाभ टंचाईच्या काळात पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतीला होणार आहे.
पानशेत धरणामधून सध्या 600 व टेमघरमधून 275 क्युसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासला धरणाची पाणीपातळी 94 टक्क्यांवर पोहोचली आहे. ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे धरणक्षेत्रातील ओढे, नाल्यांतून पाण्याची मंद आवक सुरू आहे. त्यामुळे धरणसाठ्यात भर पडत आहे.- अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण प्रकल्प