नवीन उडदाची आवक Pudhari
पुणे

उडदाला प्रतिक्विंटल 7800 रुपयांचा दर

पुढारी वृत्तसेवा

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू खरीप हंगामातील नवीन उडदाची आवक सुरू झाली आहे. सोमवारी (दि. 23) अडतदार अशोक सालपे व शिवाजी फाळके यांच्या अडतीवर शेतकरी विनोद सणस (माळेगाव) व संतोष गावडे (मेडद) यांच्या उडदाला प्रतिक्विंटल 7800 रुपये असा उच्चांकी दर मिळाला. तर उडदाचा सरासरी 7351 रुपये दर निघाला.

खरेदीदार सिद्धार्थ गुगळे व अमोल वाडीकर यांनी हा उडीद खरेदी केला. उडदाला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बारामती बाजार समितीमध्ये लिलावापूर्वी शेतमालाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मापाड्यामार्फत अचूक वजन, योग्य बाजारभाव व त्याच दिवशी पट्टी याच विश्वासार्हतेमुळे आसपासच्या तालुक्यातील शेतकरी शेतमाल घेऊन येत असल्याचे बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी सांगितले.

यंदा वेळेत व समाधानकारक पाऊस पडल्याने उडीदाच्या पेरण्या वेळेत झाल्या आहेत. त्यामुळे उडीदाचे चांगले उत्पादन मिळत आहे. बारामती बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात येत असून नवीन स्वच्छ व वाळलेल्या उडीद या शेतमालास इतर बाजार समित्यांपेक्षा चांगला बाजारभाव मिळत असल्याने परिसरातून शेतमाल विक्रीसाठी बारामतीमध्ये शेतकरी आणतात, असे बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले. उडीदाला आणखी दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी आपला माल स्वच्छ व वाळवून आणावा, असे आवाहन बारामती बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT