मंचर : पुढारी वृत्तसेवा : रोडेवाडी फाटा आणि शिगवे फाटा (ता. आंबेगाव) येथे पारगाव कारखाना पोलिसांनी शुक्रवारी (दि. 21) वाहतुकीचे नियम मोडणार्या 39 जणांवर कारवाई केली. यात दारू पिऊन वाहन चालवणार्या चौघांचा समावेश आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार पारगाव पोलिस ठाण्याच्या वतीने वाहतुकीचे नियम मोडणार्यां विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे व नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी यासाठी ही कारवाई केली जात आहे.
शुक्रवारी पारगाव कारखाना पोलिस ठाणे हद्दीत वाहतुकीचे नियम मोडणारे व दारू पिऊन वाहन चालवणार्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या वेळी 77 वाहने तपासण्यात आली. त्यातील 39 जणांवर कारवाई करण्यात आली. जनतेने वाहतुकीचे नियम पाळावेत. कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नयेत. नियम पाळल्यास अपघात होणार नाहीत व जीवितहानी टळेल, असे पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे यांनी सांगितले.