सफाळे ः पश्चिम रेल्वेचा विरार- डहाणू चौपदरीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण विभागात रेल्वे वाहतुकीत आमूलाग्र बदल होणार आहे. या प्रकल्पानंतर डहाणू लोकलच्या फेऱ्यांत वाढ होईल, तसेच सध्याच्या मुख्य मार्गावर (मेनलाईन) मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी अधिक क्षमता (स्पेस) उपलब्ध होईल.याचबरोबर समांतरपणे सुरू असलेला मालवाहतूक लोहमार्गही कार्यान्वित होईल. त्यामुळे तिन्ही प्रकारच्या गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळणार आहे. मात्र या सर्व सकारात्मक बदलांबरोबरच काही तांत्रिक आणि कार्यकारी प्रश्न देखील समोर येत आहेत.
बोईसर मालवाहतूक यार्डचे स्थानांतरण, चौपदरीकरण प्रकल्पामुळे सध्याचे बोईसर यार्ड हटवून ते पश्चिमेकडे बीआरसी कर्मचारी वसाहतीजवळ हलविण्याचे नियोजन आहे. परंतु मालगाड्या जर लोहमार्गावरून येऊन या नव्या यार्डपर्यंत पोहोचत असतील, तर त्यांना लोकल आणि मेनलाईन लोहमार्ग क्रॉस करावा लागेल. ही प्रक्रिया प्रत्येक वेळेस (विशेषतः रात्री किंवा पहाटे) मेलएक्सप्रेस गाड्यांच्या गतीवर परिणाम करू शकते.
30 डब्यांची मालगाडी पार होईपर्यंत लोकल किंवा एक्सप्रेस गाड्यांना सिग्नलवर थांबावे लागणे ही प्रत्यक्षात एक गंभीर ऑपरेशनल जोखीम ठरू शकते, वाढवण बंदर आणि वाढता मालवाहतूक ताण वाणगावडहाणू दरम्यान प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पही पश्चिमेकडील बाजूलाच विकसित होत आहे.
हा प्रकल्प सुरू झाल्यावर मालगाड्यांची संख्या निश्चितच वाढेल. त्या गाड्यांनाही डहाणूपूर्वी लोकल व मेनलाईन लोहमार्ग पार करावा लागेल.त्यामुळे वाहतूक ताण अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान यामुळे लोकल व मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या गतीत मंदी, वेळापत्रकात अडथळे, मालवाहतूक वाढल्यास प्रणालीवर वाढता दबाव हे परिणाम होवू शकतात.
करता येणाऱ्या उपाययोजना
दरम्यान मालवाहतूक लोहमार्गावरून बोईसर यार्ड किंवा वाढवण बंदरासाठी स्वतंत्र उड्डाणपूल , किंवा भुयारी मार्ग () तयार करणे, ज्यामुळे लोकल व मेनलाईन लोहमार्ग क्रॉस करावा लागणार नाही, यार्ड नियोजनाचा पुनर्विचार: बोईसर पश्चिमेकडील जागी नव्या ठिकाणी सुसंगत ठिकाणी यार्ड विकसित करणे, वाहतूक विभागणी: मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक यांची वेळेवर आधारित विभागणी करणे, जेणेकरून गती कमी होण्याचा परिणाम टाळता येईल.
चौपदरीकरण, आणि वाढवण बंदर हे विकासाचे स्वागतार्ह टप्पे आहेत. परंतु या सर्वांचा ताळमेळ राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि तांत्रिक तोडगे तातडीने आखणे गरजेचे आहे. अन्यथा वाढलेली पायाभूत सुविधा असूनही प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही गाड्यांच्या गतीत अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.दयानंद पाटील, सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था