वाडा : तालुक्यातील सावरोली गावाजवळ अघई मार्गावर नुकताच पुलाच्या उभारणीचे काम सुरू असून अतिशय संथगतीने हे काम केल्याचा लोकांचा आरोप आहे. पुलाचे काम अजूनही अपूर्णच असल्याने ये-जा करणार्या लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून पुलाचे काम अत्यंत निकृष्ट करण्यात आल्याचे स्थानिक सांगतात. शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून वरिष्ठांनी याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
सावरोली ते वेडवहाळ मार्गावर एका पुलाच्या उभारणीसाठी तब्बल 70 लाखांचा निधी मंजूर आहे. खरेतर आधीचा पूल उत्तम असताना नव्या पुलाचे काम हाती का घेण्यात आले असा ग्रामस्थांचा सवाल असून कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पुलाला मंजुरी जुनी असूनही पावसाच्या तोंडावर काम हाती घेतल्याने पूल अजूनही अपूर्ण आहे. शिवाय पर्यायी मार्ग चिखलात भरल्याने लोकांची देखील मोठी गैरसोय होत आहे.
दुचाकी व पादचार्यांना मोठी कसरत करून पूल पार करावा लागत असून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल विचारला जात आहे. पुलाचे नीट निरीक्षण केले असता दर्जाहीन काम लक्षात येत असून एका जागी पूल झुकल्यासारखा वाटत असल्याने पुलावरून वाहतूक सुरू होण्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने नीट परीक्षण करावे अशी मागणी काही तरुणांनी केली आहे.
वाडा ते वाशिंद मार्गावरील पूल कमकुवत झाल्याने लोकांना पर्यायी व्यवस्था असणार्या या मार्गावरील पूल अर्पण असल्याने लोकांनी प्रवास करायचा कसा असा सवाल विचारला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह शाखा अभियंत्यांना ही बाब लक्षात आणून दिली असून तातडीने या पुलाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.