कासा : डहाणू तालुक्यातील उर्से आंबिस्ते गावातील लोहारपाडा भागात रानडुकराने अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात लहानगा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश पराड यांचा मुलगा अद्वित जगदीश पराड (वय 5) हा सकाळी सुमारे नऊच्या सुमारास आपल्या आजीसोबत घराजवळील अंगणात खेळत होता. तेवढ्यात अचानक एक रानटी डुक्कर घराजवळ आले आणि अद्वितवर झडप घालत त्याला धडक देत पळून गेले. या हल्ल्यात अद्वितच्या उजव्या हाताला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. सुदैवाने प्राणहानी टळली.
घटनेनंतर ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी तत्काळ जखमी अद्वितला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
अद्वितच्या आजीने सांगितले की, “मी घराजवळ बसले होते, तो अंगणात खेळत होता. अचानक रानडुक्कर आले आणि काही कळायच्या आत त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.” या घटनेनंतर लोहारपाडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात रानडुक्कर, ससे, बिबटे यांचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. ग्रामस्थांनी वनविभागाकडे सुरक्षा उपाययोजना आणि जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात
महिनाभरापूर्वी डहाणू तालुक्यातील धामणी धरण परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभाग सतर्क झाला होता. तरीदेखील तो बिबट्या अजून सापडलेला नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांबाबतची भीती अद्याप कायम आहे. वनविभागाने परिसरात सतत गस्त ठेवून ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. तपासणी सुरू असून, परिसरात पिंजरे लावणे व पहारा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी.अपेक्षा साटम, वनसंरक्षक बोईसर