पालघर : आरक्षण निश्चिती झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारी सुरु झाली असून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य बनण्याची स्वप्न उराशी बालगुन असलेल्या इच्छुक आपापल्या गट व गणात मोर्चे बांधणी करत आहेत. नेत्यांच्या निवडणुकीकरिता युती आघाडीचा फार्मूला अवलंबला जातो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याची संकेत दिले जात आहेत.
सफाळे विभागगातील जिल्हा परिषदेच्या दोन जागा शिवसेनेकडे होत्या तर एक जागा बहुजन विकास आघाडीकडे होती. पंचायत समितीच्या चार जागांवर शिवसेना आणि एका जागेवर बहुजन विकास आघाडी निवडून आली होती. त्यामुळे मतदारसंघावर मागील काळात शिवसेनेची एक हाती सत्ता होती. आता शिवसेनेत दोन गट पडल्याने पक्षाचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. शिंदे सेना आणि उद्धव सेना असे दोन गट पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे सेना नेमकी कोणासोबत जाणार आणि उद्धवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिंदे सेना भाजपा सोबत असली तरी स्वतंत्र बैठका सुरू आहेत.
जिल्हा परिषद गटाचे आरक्षणही स्पष्ट झाले असून संभाव्य उमेदवार मतदार संघ आपल्याच वाट्याला अपेक्षेने मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपासह शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची भूमिका या निवडणुकीत राहणार आहे. काँग्रेस नेत्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत. या बैठकीतून पक्षाची भूमिका, निवडणुकीची रणनीती संभाव्य उमेदवारांच्या नावावर चाचणी आदी बाबीवर चर्चा वरिष्ठ नेते करित आहेत.
कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या आहेत. आपली सत्ता यावी म्हणून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान युती व आघाडीची भूमिका स्पष्ट झालेली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पालघर तालुक्यात विविध समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. प्रत्येक गावच्या रस्त्याची दुरावस्था झाली असुन वीज पुरवठा खंडित राहतो. जलजीवन योजनाही अपूर्ण अवस्थेत असल्याने पाण्यासाठीही नागरिकांना धावाधाव करावी लागते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. यावर कोणताही पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.