वसई : वसई गावातील भाऊसाहेब मोहळ (तामतलाव) या उदयानातील तलावाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता नाही, तलाव परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. असे असताना येथे प्रशासनाचे लक्ष नाही. पालिका प्रशासनाचा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जिल्हा काँग्रेसच्या एका टीमने तलावाची पाहणी केली. त्यावेळी तलावाच्या दुरवस्थेचे चित्र पाहून त्यांना धक्का बसला.
ओनील आल्मेडा म्हणाले, उत्तम आरोग्यासाठी येथे दररोज 150 ते 200 लोक व्यायामासाठी येथे येत असतात. पालक आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन येतात. वृद्ध महिला पुरुष विरंगुळा व समाधानासाठी येत असतात.
वसई विरार पालिका हद्दीत आय प्रभाग समिती कार्यालयआंतर्गत पापडी तलाव, हुतात्मा स्मारक गार्डन, ताम तलाव व गार्डन, सोमवार पेठ तलाव, भास्कर आळी (प्रभू आळी) गार्डन आणि तलाव (वाघाची वादी), देवाळे तलाव हे महापालिकेतर्फे विविध लोकांना ठेका पद्धतीने नियमित साफसफाई, स्वच्छता, त्याची निगा राखणे, झाडे, फुलझाडे यांची साफसफाई ठेवणे इ. बाबत दिले आहेत.
विशेष म्हणजे, आय प्रभागातील बांधकाम, आरोग्य, वृक्ष प्राधिकरण विभागाकडे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांना विचारणा केली असता, अधिकारी गार्डन विभाग विरारकडे बोट दाखवतात. आय प्रभागचे अधिकारी त्याबाबत काहीच माहिती उपलब्ध नाही असे सांगून मोकळे होतात.
वसईतील तलाव व उद्यान येथे महापालिकेतर्फे बोर्ड लावून त्यांची माहिती द्यावी व जनतेला तलाव व उद्यानाच्या व्यावस्थेबाबत कुठे आणि कोणाकडे तक्रार करायची याचा उल्लेखही सदर बोर्डावर करावा अशी मागणी ओनील आल्मेडा यांनी वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.