नालासोपारा : नायगाव पूर्वेच्या पूलाजवळ रात्री 11 वाजता वेणुगोपाल पोन्नम (34) या इसमावर दोन जणांनी गोळीबार केला आहे. यामध्ये कुणी जखमी झाले नाही. नायगाव पोलिसांनी याप्रकरणी लक्ष्मण पंजाला आणि पोचालू आकुला या दोघांना अटक केली आहे. ताडी विक्रीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. पोलिसांना घटनास्थली एक गोळी सापडली आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अधिक तपास सुरू आहे.
फिर्यादी वेणुगोपाल पोन्नम (34) हा नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील गोपीकिसन संकुलात राहतो. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नायगाव पश्चिमेकडून दुचाकीवरून आपल्या घरी जात होता. पूलावरून उतरून पुढे गेल्यावर काही अंतरावर त्याला दोन जणांनी अडवले. त्यांच्यात बाचाबाची झाली. काही अंतरावरून त्या दोघांनी फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली. मात्र खाली वाकल्याने वेणुगोपाल बचावला. हल्लेखोर त्यानंतर पळून गेले.
आरोपी आणि फिर्यादी हे ताडी विक्रीच्या व्यवसायात आहे. त्यांचा वाद होता असे पोलिसांनी सांगितले. मात्र आम्ही गोळीबार केला नसल्याचा दावा आरोपींनी केला. आम्ही फिर्यादीचा पाठलाग केला आणि आमच्यात बाचाबाची झाली. परंतु आम्ही गोळी झाडली नाही, असे आरोपींनी सांगितले. पोलीस या दाव्याची सत्यता तपासत आहेत.