खानिवडे : पावसाळ्यादरम्यान शहरात उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक विकासकामांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पांचगे यांनी दिली. बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच विरार पश्चिम येथील चिखलडोंगरी-मारंबळपाडा परिसरातील नियोजित स्थळांची पाहणी केली. त्या वेळी प्रदीप पाचंगे यांनी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या पावसाळापूर्व विकासकामांची माहिती बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाला दिली. शिवाय या वेळी त्यांच्या सूचनाही स्वीकारल्या.
मागील वर्षी चिखलडोंगरी येथील खारभूमी बंधाऱ्यांवर तीन उघाड्या प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी दोन उघाड्यांचे काम मागील वर्षी पूर्ण झालेले होते. या ठिकाणी आणखी दोन उघड्या बांधण्याचे नियोजन असल्याचे प्रदीप पाचंगे म्हणाले. तसेच मारंबळपाडा -चिखलडोंगरी रस्त्यावर पाणी अडते. त्या ठिकाणी कल्व्हर्ट बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे. यासोबतच डोंगरपाडा ते चिखलडोंगरी नाला रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे विनय युनिक ब्रिज ते चिखल डोंगरीसभोवती ४० चर खोदून नव्याने नाला बनविण्याचे पालिकेच्या विचाराधिन आहे. या नाल्यामुळे भविष्यात या परिसरातील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल. ही विकासकामे निविदा स्तरावर असून यातील काही कामे या वर्षी तर काही कामे पावसाळ्यानंतर पूर्णत्वास जातील, असा विश्वास कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे यांनी व्यक्त केला आहे.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर व प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनात बविआ शिष्टमंडळाने मंगळवार, ८ एप्रिल रोजी आयुक्त अनिलकुमार पवार व अन्य अधिकाऱ्यांसोबत शहरातील विविध समस्या आणि त्या अनुषंगिक कामांसाठी बैठक केलेली होती.
या बैठकीत बोळींजपासून चिखलडोंगरीपर्यंत नाल्याचे रुंदीकरण, पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी आवश्यक ठिकाणी उघड्या बांधणे, लाल खाडीजवळील उघाडी रुंदीकरण करणे आणि अनधिकृत माती भरावांमुळे अरुंद झालेले नदी-नाले रुंद करण्यात यावेत, अशा सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार आयुक्त अनिलकुमार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्यांचे निराकरण करण्यासोबतच आवश्यक कामांचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पांचगे, उपभियंता सतीशकुमार सूर्यवंशी यांनी बविआ शिष्टमंडळासोबत प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून विकासकामांची सविस्तर माहिती दिली. बहुजन विकास आघाडीच्या वतीने या शिष्टमंडळात माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील, माजी सभापती सखाराम महाडिक, माजी नगरसेवक हार्दिक राऊत आणि रंजन पाटील यांचा समावेश होता.
पावसाळ्यात शहरात साचणारी पाणी समस्या लक्षात घेता काही कामं पावसाळ्यापूर्वी करणं गरजेचं आहे. मागील वर्षीची काही कामं शिल्लक आहेत; तीही पूर्ण होणं गरजेचं आहे. शहरातील काही नाले अरुंद आहेत. त्यात पानवेली आणि मँग्रोज वाढलेले आहेत. ते काढून टाकणं आवश्यक आहे. शिवाय; काही खासगी जागांतून जाणाऱ्या नाल्यांना व्यवस्थित वाट करून देणे अशा अत्यावश्यक कामांसाठी या पाहणी दौऱ्याचे आयोजन केलेले होते. या पाहणीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या-त्या जागा दाखवून त्या दृष्टीने आवश्यक कामे आणि उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले.अजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती, वसई-विरार महापालिका