पालघर ः चार महिन्यापासून पालघर जिल्हा परिषदेच्या कंत्राटी शिक्षकांचे वेतन मिळाले नव्हते. थकीत चार महिन्याच्या वेतनाची रक्कम व चालू महिन्याचे वेतन असे मिळून 9 कोटी 53 लाख 50 हजार रुपयाची रक्कम सरकारने जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्याने शिक्षकांची दिवाळी गोड होण्याची आशा पल्लवीत झाल्या होत्या, मात्र ही रक्कम शासकीय कोषागाराला (ट्रेझरी) सुट्टी असल्याने दिवाळीनंतरच त्यांचा हातात पडणार आहे.
पालघर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची अनेक पद रिक्त असल्याने जिल्हा परिषदेने कंत्राटी मानधन तत्वावर बाराशे शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या यामध्ये काही शिक्षकांना 16 हजार रुपये प्रति महिना तर काही शिक्षकांना वीस हजार रुपये प्रति महिना पगार ठरवण्यात आले होते. मात्र या शिक्षकांना जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच तब्बल चार महिने त्यांना पगार हातात न आल्याने शिक्षकांची अवस्था वाईट होती मुलांच्या शिक्षणाचा खर्च शाळांची फी घर खर्च चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा होता. पगाराच्या रकमेची मागणी वारंवार करून सुद्धा त्यांना मिळालेला नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली होती.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा वाढीसाठी हे शिक्षक जिल्हा परिषदेने नियुक्त केले असले तरी शिक्षणाचा दर्जा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत असताना कंत्राटी शिक्षक आर्थिक अडचणीच्या बोजाखाली बोज्याखाली दबले आहेत. सरकारी नोकऱ्या नसल्याने विवंचनेत असलेले शिक्षक कंत्राटी शिक्षक म्हणून नाइलाजास्तव रुजू झाले आहेत. मात्र रुजू झाल्यानंतर ही चार-चार महिने पगार होत नसेल व तो एकत्रित केला जात असेल तर त्या शिक्षकांनी जगायचे कसे आमचा पगार हा दर महिन्याला करण्यात यावा म्हणजे आमच्या कौटुंबिक गाडा नीट चालू शकेल अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
शिक्षकांचा पगार झाल्याने त्यांना सुद्धा इतरांसारखा सणाचा आनंद घेता येणार आहे. याबाबत मला समाधान आहे.सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, पालघर